Thursday, 2 April 2015

आमची मोटारसायकल वारी .......श्रीमंत किल्ल्यांच्या दारी ! भाग -१

               गेले अनेक दिवस तयार असलेला औरंगाबाद जिल्ह्यातला अजिंठा -सातमाळ रांगेतील हा " ५ श्रीमंत किल्ल्यांचा मोठ्ठा प्लान " ....अनेक भटक्या मित्रांना  सांगून झालं होता.पण मुहूर्त काही सापडेचना.माझी दिवाळीची सुट्टीही घरीच साजरी झाली.पुन्हा रोजचं रहाटगाडगं सुरु झालं.एवढ्या लांब जायचं म्हटलं तर इतरांना उपलब्ध वेळ ,प्रवासाचं वाहन , सोबत्यांची संख्या इ. अनेक तांत्रिक बाबींवर अधून मधून चर्चा होत होती. पण नुसतीच चर्चा .अधूनमधून पुन्हा पुन्हा या प्लान चे प्रेरणास्त्रोत असलेला आमचा  फेसबुक मित्र ओंकार ओक याचा ''श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात '' हा ब्लॉग ( http://www.onkaroak.com/2014/08/blog-post_24.html ) वाचीत बसायचो.आमचं पूर्ण नियोजन त्या ब्लॉग वरूनच तयार  केलं होतं. 
              अखेर डिसेंबर महिना अखेरीस नाताळच्या सुट्ट्यांची चाहूल लागली अन मनात पुन्हा उकळ्या फुटू लागल्या.पुन्हा भटक्यांना जागं करण्याचा प्रयत्न करू लागलो.शेवटी आमचा पुणेकर हौशी मित्र योगेश पाचंगे या भटकंतीसाठी तयार झाला .अन तेही मोटारसायकल वर ....
                        आळंदी वरून संभाजीनगर / औरंगाबाद ला जाण्याचा मी निवडलेला मार्ग खालीलप्रमाणे होता.
  • ·         आळंदी देवाची (पुणे ) –पेरणे फाटा हून पुणे नगर महामार्ग –अ.नगर –औरंगाबाद – कन्नड शहर –सिल्लोड रस्त्याने – वासाडी गाव –करंजखेड फाटा – करंजखेड गाव – नागापूर –खोलापूर – अंतुर किल्ला
  • ·         अंतुर किल्ला –खोलापूर –नागपूर -- गौताळा अभयारण्य क्षेत्रातून औट्रम घाट उतरून –सायगव्हाण –नागद गाव –महादेव टाका फाटा --- महादेवटाका डोंगर म्हणजेच लोन्झा किल्ला .
  • ·         लोन्झा किल्ला –नागद ते बनोटी रस्त्याने बनोटी गाव – नायगाव –कच्च्या रस्त्याने सुतोंडा किल्ला
  • ·     सुतोंडा किल्ला –नायगाव –बनोटी –सोयगाव –वेताळवाडी गाव – हळदा घाट माथ्यावर    वेताळवाडी किल्ला
  • ·          वेताळवाडी किल्ला –हळदा गाव –उंडणगाव –अंभई—नानेगाव— जंजाळा गाव – जंजाळा किल्ला.
·         परतीचा प्रवास -----जंजाळा गाव – अंभई –भराडी –सिल्लोड –औरंगाबाद –अहमदनगर – आळंदी देवाची ,पुणे.
 * हा पूर्ण मार्ग उलट क्रमाने फिरूनही हे ५ किल्ले बघता येतात.एकूण ३ दिवस पूर्ण असा कालावधी किल्ले बघाण्यास आवश्यक.
*  लक्षात ठेवण्यासारखे :  गावांदरम्यान चे रस्ते अगदी खराब आहेत .चारचाकी वाहनाने गेल्यास वाहनाची अन आपली हाडं खिळखिळी होणार. दणकट आणि आरामदायक दुचाकी अन तेही गरजेच्या देखभाल साठीचे सर्व हत्यारे ( दोरी, पहाने ,स्क्रूचावी ,पक्कड इ.) सोबत अशी तयारी असावी.
या परिसरात धूळ मुक्तपणे संचार करत असते . नाश्ता ,जेवणखाण स्वत : बनवणे केल्यास उत्तम .हॉटेल्स अपेक्षेला उतरतील असे नाही.कुठेही मुक्कामाची तयारी असू द्यावे.
स्थानिक माणसांशी सुसंवाद साधावा .नक्की मोलाची मदत करतात.वाटाड्या म्हणुंनही.
                  आणि अखेरीस तो दिवस उजाडला !! गुरुवार ,२५ डिसेंबर २०१४. पहिल्यांदाच मोटारसायकल वर इतक्या लांबवर प्रवास आणि  ५ किल्ले भटकंती  , ४ दिवस !
                  सगळी तयारी करून झाली होती.सकाळचे ११:३० झाले होते .खुद्द योगेश पाचंगे पुण्याहून आळंदीत माझ्या घरी हजर .१५ मिनिटातच दोघांच्या ब्यागा व्यवस्थित भरून घेतल्या. गाडीला टांग मारली. दोन मोठ्ठाल्या ब्य्यागा म्हणजे विंचवाच बि-हाड पाठीवर अशी गत होती.
              तास दीड तास भराने सरदवाडी च्या वळणावर हॉटेल नवनाथ मधली मिसळ भरपेट खाल्ली.पुन्हा मीटर चालू . सं.६ ते ७ च्या दरम्यान  वाळूंज  MIDC नंतर रेल्वे क्रॉसिंग पाशी हे ट्राफिक जाम. बाकीच्यानसारखाच डांबरी सडक सोडून कशीबशी रुळावरून गाडी पुढे काढली .नगर नाका चौकात पोलीसमामांना कन्नड साठी वाट विचारून वेरूळ लेणी,घृष्णेश्वर  च्या मार्गाने पुढे कन्नड शहरात पोहोचलो.रात्रीचे ९:३० वाजले होते.खूप वेळ गाडीवर बसून होतो.जवळजवळ ३१५ किमी .अंतर पार पाडलं होतं.. नियोजनानुसार कन्नड शहरानंतर नागपूर किंवा खोलापूर या अंतुर किल्ल्याजवळच्या गावात पोहोचायचे होते.आणि मग पोटोबा करायचा होता.
              योगेश ला चौकातल्या टपरीवर पुढची वाट विचारायला सांगितले . तर तिथल्या २ - ४ स्थानिक व्यक्तींनी पुढे जाऊ नका , रात्रीची वेळ आहे आणि पुढे अभयारण्य क्षेत्र आहे असं सांगितलं .त्यांनी आमची इतर चौकशी केली. ट्रेकिंग वाले  म्हटल्यावर लोकं मदतीला आली .मी त्यांना आमची कुठंतरी मुक्कामाची सोय होईल का विचारलं.....तर त्यांच्यातल्या दत्तू सोनावणे नावाच्या सद्गृहस्थाने सां.बां.विभागाच्या कार्यालयाच्या आवारात येण्यास सांगितले .दुस–याने तर कहर केला.....आम्ही जेवण बनवणार आणि  मग जेवण करणार हे कळल्यावर त्याने नाय व्हय करता करता आमच्याकडची Maggi ची पाकिटेच घेऊन गेला.
आणि १० -१५ मिनिटात,आम्ही तिकडं ब्यागा उतरवून फ्रेश होतो न होतो तोच  ......गरमागरम ,वाटाणा आणि  गाजरं घातलेली Maggie घेऊन हज्जर !! .....अशी एक एक माणसं भेटतात भटकताना ......


                          मस्त पैकी Maggie फस्त करून सर्वांशी गप्पा टप्पा तसेच आमचा भटकंतीचा पुढचा मार्ग इ.चर्चा झाली .आम्ही दोघंच आणि  मोटारसायकल वर एवढ्या लांब किल्ले बघायला हेच त्यांना मोठं अप्रूप वाटलं होतं. गप्पा टप्पा नंतर १२ वाजता झोपी गेलो..
                        पहाटे ५:३० ला उठलो आणि आवरायला घेतलं. ६ वाजता गर्रम चहा सोबत बिस्किटे खावून घेतली. ब्यागा गाडीवर बांधल्या आणि दत्तू सोनावणेचा निरोप घेतला

                     वरच्या छायाचित्रात उजवीकडे उभे असलेले श्री. दत्तू सोनावणे.  हे म्हणजे जणू एखाद्या कथा कादंबरीतलं पात्रच.....आमची मुक्कामाची सोय केल्यानंतर घरी जाऊन येतो  म्हटले .आमच्यासारखेच  अजून कोणी पाव्हणं त्यांच्या घरी येणार होते.त्यांचा पाहुणचार केला घरी. स्वत :च्या  भाड्याच्या घरात ४ -५  जणांची रहायची सोय केली .अन हे बहाद्दर स्वत: अंथरून पांघरून घेऊन इकडं आले झोपायला.अतिथी देवो भव :
             वार -शुक्रवार ,दि.२६ /१२/२०१४ .....  सकाळी ७ वाजता आम्ही कन्नड मधून निघालो होतो.  आता वेध लागले होते ते कधी एकदाचं अंतुर किल्ल्याला पोहोचतोय त्याचे !.....
कन्नड नंतर पुढे अभयारण्यक्षेत्रातून हि सडक जाते. 


करंजखेड –नागपूर मार्गे या पाटीपाशी पोहोचल्यावर हायसे वाटले .
नागपूर नंतर खोलापूर पासून किल्ला अंतुर च्या दिशेने जाताना खोलापूर गावानंतर पुढ कच्च्या रस्त्याने  (वन खात्याने बनवलेला) पुढे जाताना  एक ठिकाणी उजव्या बाजूला हा स्तंभ दिसतो.

ह्याच्या चारही बाजूंना अंतुर किल्ल्याच्या चारही बाजूंना असणा-या गावांची नावे त्यांच्या दिशांप्रमाणे त्या त्या बाजूला फार्सी भाषेत लिहिलेली आहेत
अजून थोडं पुढ गेल कि वाटेच्या उजव्या बाजूला हि मारुतीरायाची मूर्ती दिसून आली



 तसंच पुढ जाताना वन खात्याच्या ऑफिस पाशी च्या वळणावर  अंतुर किल्ल्याचं पहिलं दर्शन झालं आणि.......

                                                                 मनात विचार आला ......याचसाठी केला होता अट्टाहास !!.....
                        तसं इथून अजून पुढ गाडीरस्ता जातो.पण पुढे माणसांची वर्दळ कमी दिसल्यामुळे वनखात्याचे ऑफिसपाशी दुरुस्ती काम करणा-या कामगारांशी थोड्या गप्पा मारल्या .आमच्या जड ब्यागा आणि गाडी तिथं ठेवू देण्यास विनंती केली .तर ते बिनधास्त ठेवून जावा म्हटले.
 वेळ .- स.१०:३५ .मोटारसायकल लावली .किल्ल्याचा नकाशा ,माहितीचे कागद ,पाण्याच्या बाटल्या आणि खाऊ सोबत घेतला. आता आम्ही  जरा मोकळं किल्याच्या दिशेनं चालू लागलो. किल्ल्याचा नकाशा माहितीसाठी ......सौजन्य -- ट्रेकक्षितीज संस्था संकेतस्थळ.


इथून थोडे पुढे गेलं कि  वन खात्याच्या प्यागोडाजवळ पोहोचलो .


इथेच वाहनतळ आहे .समोरच  किल्ल्याचा प्रमुख आकर्षण  असलेला भव्य बुरुंज दिसला ....

इथून खालच्या दिशेनं  किल्ल्यात जाणारी वाट बनवलेली दिसते.


 वरती बघितल्यास काही बुरुंज दिसतात.त्यात एक तिहेरी बुरुंज लक्ष वेधून घेतो.

वेळ .स.११ .- समोरच दिसलं हे भव्य असं किल्ल्याचं पहिलं दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार ......इथून सुरु होतं या किल्ल्याच्या श्रीमंतीचं दर्शन !!
 दरवाजाच्या कमानीमध्ये  वरती कोनाड्यात उजवीकडे एक शरभ शिल्प दिसून आले .
या दरवाजासमोरच एक दगडी तोफगोळा पडलेला होता.
 

इथून थोडं पुढे गेलो आणी काटकोनात उजवीकडे वळलो आणि दुसरं प्रवेशद्वार स्वागताला तयार  !!
 पूर्वेकडे तोंड असलेले हे द्वार .
 या दरवाजाचे बुरुंज हे चौकोनी आकाराचे आहेत .

वरती कमानीमध्ये शत्रूवर मारा करायला अशा खाचा दिसून आल्या .


आतल्या बाजूस पहारेक-यांच्या देवड्या आहेत 

दरवाजावर लावलेले तोफगोळे .......कोरलेली कमलपुष्पे

अजून पुढे चालत पाय-या चढून गेल कि काटकोनात वळलो..आणि समोर तिसरं प्रवेशद्वार !!
दक्षिणेकड तोंड असलेले असं ....

 या दरवाजाच्या कमानीमध्ये  मध्यभागी ५.५ फुट लांब आणि२ फुट रुंद असं हा फारसी भाषेतला शिलालालेख दिसला ....

या दारातून आत गेलो तर उजवीकडे  एक वास्तू दिसली 
....तिच्या उजव्या कोप-यातून वर दरवाजाच्या वर जाण्यास पाय-या होत्या ..


आम्ही वर गेलो तर तिथून या प्रवेशद्वारांची रचना बघायला मिळाली ....अप्रतिम !!






......परंतु आजमितीला वृक्षांनी खूप पडझड झालीये ...

.....इथून फोटोग्राफी झाली अन उजव्या हाताने आम्ही तटबंदी बघत पुढे गेलो ...
.डावीकडे थोडं उंचावर गेल कि एक तलाव दिसला
 आणि उजवीकडे २ मोठ्या वास्तू अथवा राजसंकुल दिसलं .आत गेलो तर वटवाघुळांच साम्राज्य ....






एका वाड्याच्या वर जाण्यासाठी पाय-या हि दिसल्या .
वाड्यापासून सरळ पश्चिमेला चालत गेलो .वाटेत एक दर्गा दिसला .
अजून थोडं पुढ वाटेवरच एक उध्वस्त वास्तू दिसली.

थोडं पुढ उजवीकडे उंचावर एक चौकोनी आकाराचा सुट्टा असा  टेहळणी बुरुंज दिसला..


 आम्ही पाय-यांनी वर गेलो....आणि इथून संपूर्ण किल्ल्याच दर्शन घेतलं.


समोर पाण्याचा तलाव , किल्ल्याच्या दक्षिण बाजुच मध्येच बांधलेली तटबंदी आणि त्याअलीकडे २ उध्वस्त वास्तू आणि शेवटी टोकाला झाडीमध्ये असलेला किल्ल्याचा प्रमुख आकर्षण असलेला भव्य बुरुंज दिसतो ...
खाली उतरून तलावा पासून पुढ निघालो ....तलावाच्या दक्षिणेला एक भव्य दरवाजा दिसला.थोडंसं आत जाऊन बघितलं.

तलावापासून पुढे दक्षिणेला चालत निघताना वाटेत २ उध्वस्त वास्तू दिसल्या ...

इथून उजवीकडे थोडं खाली उतरलो...तटबंदीच्या बाजूला ...तर कातळाच्या पोटात असलेल्या कोरीव टाक्यांपाशी पोहोचलो. चार खांबी अशी हि टाकी   .....पिण्यायोग्य असं यातलं एक टाकं आहे.


पाण्याच्या टाक्यांपासून माघारी पायवाटेने तटबंदी बघत दक्षिणेकडे  आलो ....
मध्ये एक बुरुंज दिसला ....
पुढे जाताना समोर किल्याच्या दक्षिणेकडे निमुळत्या टोकाकडे निघालो.एक दरवाजा आणि बुरुंज ओलांडला .


तो पाहतो तर काय.........मघाशी टेहळणी बुरुंजावरून पाहिलेली किल्ल्याला दोन भागांत विभागणारी तटबंदी आणि तिचे २ भव्य बुरुंज ,तीच्यामधून अलीकडे पलीकडे जाण्यास असलेली द्वारं.....हे विशाल दृश्य नजरेत सामावून घेतलं .


एव्हाना दुपारचे १ वा .४० मिनिटे झाली होती.या तटबंदी समोरच्या मोठ्या वृक्षाखाली बसून थोडीशी पोटपूजा करून घेतली .नंतर इथून पुढे दक्षिण टोकाकडे पोहोचलो .आणि समोरच .....हाच तो किल्ल्याचा बाहेरून दिसणारा  भव्य बुरुंज ....याला या बाजूने आत मधून खोली केलेली दिसली.दोन्ही बाजूला तळघर वजा खोल्या आहेत.यात दगड पडलेली होती .
पाय-या चढून वर गेलो ...आतल्या  बाजूला देवड्या आहेत ...
पलीकडे खाली उतरलो ..समोरच एक बाबांचा दर्गा दिसला.इथ आपले मुस्लीम बांधवांची वर्दळ असावी.रंगरंगोटी केलीये.

हे सर्व बुरुजाच्या आतून आहे.
थोडं वर चढून गेलो तर थेट बुरुजाच्या माथ्यावर ...

आणि समोरच पठार आणि हा बुरुंज यांच्या मध्ये असलेला ५० फुटी खंदक......किल्ल्याला भक्कम करण्यासाठी समोरची डोंगर रांग आणि किल्ला यांच्यामधील कातळ फोडून बनवलेला .....
.इकडूनही मागे उत्तरेकडे पाहिलं कीं संपूर्ण किल्ला दिसतो....
आणि समोर पाहिलं तर वाटेवरचं प्यागोडा आणि  गाड्यांच वाहनतळ वं आजुबाजूच  परिसर दिसतो ..


खाली उतरून बाहेर आलो आणि या बुरुजाच्या बाजूच्या  लहानशा दरवाजातून बुरुजाच्या तटबंदीत शिरलो...आणखीन विलक्षण !!!
 तो भव्य खंदक आणी हा भक्कम ,भव्य बुरुंज अजून जवळून बघायला मिळाला.

आताशा किल्ला पूर्णपणे बघून झाला होता .त्यामुळे तटबंदी कडेकडेन माघारी पायवाटेने मुख्य प्रवेश द्वाराकडे आलो.

पुनश्च एकदा या ३ प्रवेशद्वारांच स्वागत स्वीकारलं अन निरोप द्यावा अशी विनंती करून बाहेर पडलो....पाय निघत नव्हता 


                    वेळ . दु .२:३०......पुन्हा पुन्हा या किल्ल्याच्या श्रीमंतीचे अनेक पैलू वळून वळून बघतच वाहनतळ ओलांडून कच्च्या वाटेन चालत निघालो .
नुकत्याच पाहिलेल्या त्या बुरुंजाच ते अंतर्बाह्य असं भव्य रुपडं काही डोळ्यासमोरून जात नव्हतं आणि जाणारही नाही कधी . किल्ल्याच्या वैभवाबद्दल गप्पा मारत मारत ....चालत चालत वन खात्याच्या  ऑफिस पाशी आलो ते कळलंच नाही.....मोटारसायकल काढून ब्यागा चढवल्या.



....अंतुर किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छायाचित्र काढली.भटकंतीची  सुरुवात तर एकदम दिमाखदार झाली होती .....१ ला दिवस निम्मा सरून गेला होता .आता  नाईलाजाने या श्रीमंत  किल्ल्याचा निरोप घेऊन पुढल्या श्रीमंत किल्ल्याच्या ओढीनं गाडीला टांग मारली .
क्रमश:

पुढील घटनाक्रम वाचा ....पुढील भाग  २ रा मध्ये ...लिंक -  http://rajjeshjadhav.blogspot.in/2015/05/blog-post_6.html
भाग ३ रा साठी लिंक - http://rajjeshjadhav.blogspot.in/2015/05/blog-post_11.html

 
 

5 comments:

  1. Awesome description Rajesh....Please keep up the good work of directing all the trekkers and hikers with ur words...

    ReplyDelete
  2. survat changli ahe, sudharana karat pudhil bhagat ajun navin intresting mahiti de. BEST OF LUCK FOR PART 2.....!

    ReplyDelete
  3. धन्यवाद ! मित्रांनो ......

    ReplyDelete
  4. सूचक आणि खिळवून ठेवणारं वर्णन #trekmates

    ReplyDelete