Saturday, 2 May 2015

गडकोटांचा जागर .....दुर्गजागर अभ्यासवर्ग !!


           !! दुर्गजागर  अभ्यासवर्ग !!
          गेले महिनाभर सोशल मेडीयावर ‘दुर्गजागर  या एका शब्दाचा मोठ्ठा जागर चालू होता.जणू  इथे उपस्थित लोकांना या जागराचा विसर पडू नये.ते जागे राहावेत  प्रत्यक्ष जागराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत  यासाठी हा प्रयत्न !...वर्तमानपत्रांतूनही जनसामान्यापर्यंत  तो पोहोचवण्यात आला. उद्देश हाच कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकोटांचा हा जागर  महाराष्ट्रातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचावा. व या कार्यक्रमाला उपस्थिती लावून  दिग्गज अशा या व्याख्याते मंडळींचे  मोलाचे शब्द कानी पडावे. त्यातून आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची ,या  हिंदवी स्वराज्याची बलस्थाने , प्रेरणास्थाने असलेले हे दुर्ग संवर्धित केले जावेत. सर्व वयोगटातील तमाम जनेतेने अभ्यासू  आणि डोळस वृत्तीने या गडकोटांना भेटी द्याव्या. आपली मने कायमच जागृत ठेवावीत. प्रामुख्याने आजची तरुण पिढी डोळ्यासमोर ठेवून हा ‘ जागर ‘ आखण्यात आला होता.

        हरितभूमी  फौंडेशन या संस्थे सोबतच शिव सह्याद्री दुर्गसंवर्धन , शिवस्फूर्ती , झुंजार शिलेदार, गडवाट , शिवसंस्कार आणि भटकंती कट्टा संघ, पुणे या  विविध संस्थेतील लोकांनी एकत्र येत या अभ्यास वर्गाचे आयोजन करणेत आले होते.
         जसजसा  २६ एप्रिल २०१५ हा दिवस जवळ येत होता  तसतसे वातावरण अजूनच जागृत झालेले दिसत होते. या कार्यक्रमाचे सशुल्क पासेस ची विक्री जोमाने चालू होती. फेसबुकवर अनेक शहरांतून एकत्र आलेले दुर्ग भटके , इतिहास प्रेमी , शिवशंभू प्रेमी सर्वांची लगबग दिसून येत होती .जो तो जमेल तशा पद्धतीने या कार्यक्रमाची माहिती लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत होता.
             आणि  तो दिवस उजाडला !.... 
  
         रविवार , दि. २६ एप्रिल २०१५. स्थळ – पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह , ब्रेमेन चौक , औंध .पुणे .वेळ – सकाळचे  ७ वाजून ४० मि......मी  अन लखन घाडगे दोघे मोटारसायकल वर  ठरलेल्या वेळेच्या अगोदर कार्यक्रमस्थळी हज्जर .कलामंदिर चे आवारात एव्हाना चांगलीच गर्दी जमू लागली होती. बहुदा सर्वांना खूप उत्कंठा निर्माण झाली होती. प्रत्यक्ष जीवन आणि फेसबुक वर मित्र असलेले अनेकजण एकमेकांच्या गाठीभेटी घेत होते. कार्यक्रमाचे संयोजनात असलेले अनेक हौशी भटके तयारीला लागले होते ..... बोंबल्या फकीर अर्थातच रवी पवार , प्रशांत लवाटे –पाटील,श्रद्धा मेहता , किशोर गरुड , पूनम पाचारणे ,गणेश मुजुमदार ,जीध्नेश खंडाळकर ,शीतल जाधव , धनश्री लेकुरवाळे इ . अनेक जण इकडून तिकडे धावपळ करताना दिसून येत होते.
          बरोब्बर ८ वाजता  कलामंदिराचे भव्य प्रेक्षागृहात प्रवेश देण्यास आरंभ झाला. प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंला श्रोत्यांना दुर्गजागर चा एक बेच , नोंदवही पेन, चहा नाश्ता आणि जेवणासाठीचे कुपन्स आणि एक माहितीची स्लीप देण्यात येत होती.
     डावीकडील प्रवेशद्वारात  कामात मग्न स्वयंसेवक --धनश्री लेकुरवाळे, ,श्रद्धा मेहता , जीध्नेश खंडाळकर
            आणि  उजवीकडील प्रवेशद्वारात  कामात मग्न स्वयंसेवक --कुलदीप पाटील, पूनम पाचारणे  आणि गणेश मुजुमदार. 



      आतल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किशोर गरुड  येणाऱ्या श्रोत्यांचे पास तपासून त्यावर  दुर्गजागर चा  अधिकृत शिक्का मारून प्रवेश देत होते.
    स.८ :३० वाजेपर्यंत प्रेक्षागृहात सर्वजण आसनस्थ झाले होते. यानंतर देण्यात आलेली माहितीची स्लीप भरून देण्याचे आवाहन करणेत आले.

        मी अन माझे भटकंती मित्र श्री.ईश्वर गायकवाड काका ,श्री.योगेश पाचंगे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.धनश्री पाचंगे, गिर्यारोहक श्री.सुनील पाटील आणि कृष्णानंद कोबारणे खालील चित्रात




 दुर्ग जागर  अभ्यासवर्गाची रूपरेखा:

०८::०० ते ०८:३० : नाव नोंदणी
०८ :::३० ते ०८:४५: प्रस्तावना आणि अध्यक्षीय भाषण
०८ : ::४५ ते १०:१५: दुर्गस्थापत्य - श्री. सचिन जोशी
१० : :१५ ते १०:३०: चहापान
१०:: ३० ते १२:००: मराठ्यांचे आरमार आणि सागरी किल्ले - श्री. भगवान चिले
१२: :०० ते १२:४५: भोजन विश्राम
  १२ :४५ ते :४५: भारतातील अदभूत दुर्ग आणि त्यांची दुर्ग रचना - दुर्गमहर्षी प्रमोद मांडे
      दुर्गजागरचे व्याख्याते थोडक्यात परिचय :
१ ) "दुर्गस्थापत्य " या विषयावर श्री सचिन जोशी ( राज्य सरकार स्थापित दुर्ग संवर्धन समितीचे सन्माननीय तज्ञ सदस्य आणि रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा, रायगड जिल्हाचे दुर्गवैभव या पुस्तकांचे लेखक
२ ) "मराठा आरमार आणि सागरी किल्ले" या विषयावर श्री भगवान चिले ( राज्य सरकार स्थापित दुर्ग संवर्धन समितीचे सन्माननीय तज्ञ सदस्य आणि वेध जलदुर्गांचा, गडकोट, दुर्गांच्या देशा, दुर्गसंपदा महाराष्ट्राची, अपरिचित गडकोट, दुर्गम दुर्ग या पुस्तकांचे लेखक.
३ )  "भारतातील अद्भुत दुर्ग आणि त्यांची दुर्गरचना या विषयावर दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर.... सरांची दुर्गमहर्षी ही पदवीच सगळं काही सांगून जाते.. महाराष्ट्रातल्या चारशे किल्ल्यांसोबत भारतातील १००० किल्ल्यांचे रेकॉर्डस -इतिहास आणि स्वतः काढलेली छायाचित्रे सरांच्या गाठीशी आहेत.
        वेळ – स .८ : ५० ..... उपस्थित प्रेक्षकांचे स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राहुल कराळे – पाटील यांनी हाती घेतले.

      यानंतर शाहीर स्वप्नील कोलते पाटील यांनी आपल्या खड्या आवाजात  पोवाडा गाऊन त्यातून  गडकोट आणि आजचा दुर्गजागर यांची सांगड आणि महती ऐकवून प्रेक्षकांमध्ये वातावरण निर्मितीला हातभार लावला .

       कार्यक्रमाचे  क्षण चित्रबध्द करण्यासाठी  श्री .प्रशांत लवटे –पाटील आणि श्री. विशाल नायकवडी आणि इतर आपले कसब पणाला लावताना दिसून आले.
 तसेच ज्येष्ठ इतिहासप्रेमी ,गडकोट प्रेमी , संपूर्ण भारत दुचाकीवर भ्रमण करून गडकिल्ल्याना भेटी दिलेले तसेच गडसंवर्धनात  आघाडीवर असलेले श्री. मिलिंद क्षीरसागर स्वतः कार्यक्रमाचे चलचित्रण ( Video Shooting ) करीत होते.

       तदनंतर इतिहासाचे अभ्यासक , दुर्गप्रेमी, निसर्गछायाचित्रकार श्री.दामोदर मगदूम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली

       यानंतर कार्यक्रमाचे मानबिंदू आजचे माननीय व्याख्याते श्री.सचिन जोशी , दुर्गमहर्षी श्री .प्रमोदजी मांडे .श्री.भगवानराव चिले यांचे शुभहस्ते छत्रपती श्री.शिवाजी महाराज आणि श्री.संभाजी महाराज  यांचे पुतळ्यास विनम्र अभिवादन करून आणि  पुष्पहार अर्पण करून दुर्गजागर व्याख्यानमालेस प्रारंभ करणेत आला

        दुर्गजागर  - सत्र पहिले
        दुर्गजागरच्या  १ ल्या सत्राचे सन्माननीय वक्ते श्री.सचिन जोशी सर यांची ओळख  रोहित पवार यांनी सर्वांना करून दिली....आणि सरांना मार्गदर्शन करणेस विनंती केली . श्री.जोशी सर हे पुरातत्व विभाग ,डेक्कन कॉलेज, पदव्युत्तरआणि संशोधन संस्था .पुणे येथे कार्यरत असून  दुर्गभ्रमंती , त्यांचा स्थापत्यविषयक अभ्यास  करीत आहेत.तसेच त्यांनी एकूण ७ अपरिचित अशा दुर्गांचा शोध घेऊन त्यासंबंधी पुरावे गोळा करून शासन दरबारी त्यांची नोंद करविली आहे.
       मान. जोशी सर यांनी  स्लाईड शो च्या साह्याने अगदी सरळ सोप्या शब्दांत आपले दुर्गस्थापत्य विषयक विचार मांडले. ते म्हणाले , छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी गडकिल्ल्यांची बांधणी , उभारणी करू त्याचं उचित वापर केला.  या गडकोटांना भेट देताना त्याबद्दल ची कुठलीही माहिती अभ्यास करून , शोधा ,पडताळून पहा.

१ . दुर्ग  किंवा किल्ला म्हणजे काय ? - आपल्या वरील परकीय आक्रमणापासून   त्या त्या प्रदेशातील राजे महाराजांचे बचावाचे, संरक्षणाचे ठिकाण
२.  तटबंदीची संकल्पना  - तात्पुरते आणि कायमस्वरूपी अशा दोन हेतुनुसार तटबंदी ची बांधणी गडकोटांवर केली जायची.   ,
 ३. बुरुजांचे प्रकार – आकारानुसार काही गडकिल्ल्यांवर आपणास वर्तुळाकार , चौकोनी ,षटकोनी इ. प्रकारचे बांधणी असलेले बुरुंज दिसून येतात. तसेच दुहेरी थरांमध्ये तटबंदी आणि बुरुंज हि दिसतात. तटबंदी बाहेर खंदकांची रचना हि खूप उपयोगाची ठरत.यासंबंधी किल्ले दौलताबाद ची माहिती करून दिली. या एकमेव किल्ल्याची तटबंदी  अशी आहे जी जमिनी वर सुरुवात करून डोंगरावर नेणेत आली आहे.
        तसेच जलदुर्गांच्या  बाहेरचे खंदक कसे वैशिष्ट्यूर्ण आहेत हेही स्पष्ट केले.
 यानंतर  कालगणनेनुसार किल्ल्यांचा इतिहास समजावून दिला ...तो पुढीलप्रमाणे...
१ .- स्थापत्याविषयी पौराणिक ग्रंथातील उल्लेख जो ४५०० वर्षांपूर्वीच्या हडप्पा – मोहेंजोदडो या शहरांबद्दल आढळतो .या शहरांची रचना , त्यांची तटबंदी यांतून आपल्याला दिसून येतो .
दोन ऐतिहासिक ठिकाणे जवळ जवळ असली म्हणजे त्या दोहोंचा काळ एकच अस मानु नका.तर  त्या विषयी तसे पुरावे असणे महत्वाचे .ते शोधावेत.
 .Early Medieval Periodसुरवातीचा मध्ययुगीन कालखंड -६ वे शतक .. राजा भोज च्या कारकिर्दीत पन्हाळा .खेळणा आणि रांगणा या किल्ल्यांची बांधणी झाली.
३. Medieval Period-  मध्ययुग – १३ व्या / १४ व्या शतकात जी बांधणी झाली त्यात मोठ्या आकाराचे अर्धवर्तुळाकार बुरुंज आणि मोठी प्रवेश्व्द्वारे हे वैशिष्ठ्य दिसून येते.
४ . Submerged Stone Structureपाण्याखालील  दगडी बांधकाम –
       जलदुर्ग असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात एक भिंत बांधण्यात आली होती.जिला धडकून शत्रूची जहाजे निष्क्रिय करता येत. असं जे म्हटले जाते त्यासंबंधी   N I O ( National Institute of Oceanography  या संस्थेने त्या भिंतीचा अभ्यास केला.त्याची चित्रे प्रसिद्ध केली.त्या भिंतीचे  आकारमान , दगडांचे आकार , रुंदी इ .बाबी मांडल्या. ते सर्व कसे असंबद्ध आहे ते जोशी सरांनी आपल्या अभ्यासाद्वारे पटवून दिले.तसेच वेळणेश्वर जवळील अशीच एक समुद्रातील भिंत आणि हि भिंत हे केवळ  ‘डाईक’ या भूगर्भशास्त्रीय रचनेचे नैसर्गिक भूरूप आहे असे ते म्हणाले. त्या भिंतीचे  दगडांचे स्वरुप हे नैसर्गिक बनून आले आहे.
६.किल्ले जंजिरा – वैशिष्ठ्यपूर्ण अशा या किल्ल्याचा अभ्यास करा, इतिहास निट वाचा. किल्ल्यातील बांधकामे , तोफा , बुरुंज  इ. बद्दल योग्य माहिती घ्या आणि ती ठिकाणे बघावीत .कोणत्याही बांधकाम व वस्तू याबद्दल सत्य माहिती घ्या. इतरांना सांगा.उगाच वाढवून सांगू नये. यासोबत त्यांनी कलालबांगडी या तोफे बाबत  तिचे घटक, तिचे वजन इ. चा कसा अभ्यास केला तेही सांगितले.
७. जलदुर्ग किल्ले पद्मदुर्ग –छत्रपती श्री .शिवाजी महाराजांनी कासा बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधला. त्याचे स्थापत्त्य कसे महत्वाचे ते सांगितले.
८ .विजयदुर्ग आणि खारेपाटण हे २ वेगवेगळे दुर्ग आहे. ते एकच आहे असं काही लोकांचे म्हणणे चुकीचे कसे ठरते ते स्पष्ट केले.
९ .- खंदेरी या शिवरायांनी बांधलेल्या जलदुर्ग बाबत --  तेथील वेताळ देवाचा दगड ज्याला माशांचे जबड्याचा सांगाडा वाहतात, त्यातून येणारा आवाज  इ. चा अभ्यास होणे गरजेचे.  
१०.- जलदुर्गांच्या तटबंदी मध्ये चुन्यासोबत Lead शिसे घातले जाई असे जे म्हणतात त्यावर शंका येते. ते खनिज Arogoniteअसल्याचे अभ्यासाअंती आढळून आले. जलदुर्गांच्या भिंतीवर पाण्याच्या सतत होणाऱ्या माऱ्यामुळे प्रक्रिया होऊन  ते चुन्याचे कडक दगड बनून राहिले. चुन्यासोबत बांधकामात लोखंडी रॉड घातले असल्याचे    जुन्नर  जवळच्या चावंड किल्ल्यावरील दरवाजाजवळ दिसून आले.
        इतिहास आणि गडकिल्ले  भावनेतून नाही तर अभ्यास करून , पुरावे गोळा करून समजावून घ्या. असा मौलिक उपदेश त्यांनी दिला.   
११.दुर्गदुर्गेश्वर , शिवतीर्थ किल्ले रायगड – महादरवाजा च्या वरच्या बाजूला असलेली पाण्याचे मोठ्ठे टाके शत्रूंवर हल्ला करताना फोडली ज्याने त्यातले पाणी  वाहून दरवाजाजवळ आलेलं शत्रू सैन्य वाहून गेल.हे  अगदीच असंबद्ध वाटते. कारण दरवाजा  जवळ सेवेत लोकांना पाण्याची गरज  , तिथून दुसरे पाण्याचे टाके वरती गडावर आहे जे लांब आहे.  तसेच शत्रूवर गरम तेल ओतले जाई हे कसं मानायचे. कारण एवढे तेल उपलब्ध असायचे का ?....आणि शत्रू जवळ आला कि ते तापवायला घ्यायचे. त्याचा उकळण्याचा बिंदू प्राप्त होणे हि शास्त्रीय बाब आहे . तसेच रायगडावरील लोहस्तंभ – जो शिक्षेसाठी वापरला जाई याबद्दल हिमाहिती दिली
१२. बहादूरगड  अर्थात धर्मवीरगड ( दौंड शहरानजीक चा भुईकोट किल्ला ) – येथील यादवकालीन मंदिरे, १२ व्या शतकातील आहेत .आणि किल्ल्याचे बांधकाम हे १६ व्या शतकातले आहे. येथील पाण्याची मोट वैशिष्ठ्यपूर्ण. एक शहर रचनाच होती या किल्ल्यात. हमामखाना , सांडपाण्याची व्यवस्था  आणि इतर बांधकामे व्यवस्थित अभ्यासून बघणे गरजेचे. हे छायाचित्रांद्वारे स्पष्ट केले .
१३. सह्याद्रीतल रत्न – किल्ले रतनगड  (भंडारदरा धरणाजवळ )ता. अकोले .जि.- अ.नगर .
किल्ल्याचा महादरवाजा ब्रिटीशांनी फोडला. तशा त्यांनी जाताना नोंदी हि करून ठेवल्या होत्या. अशा नोंदी. पुरावे असणे महत्वाचे ठरते.
१४.द्वार शिल्पे – अनेक गडकिल्ल्यांवर प्रवेशद्वारावरील भागात  श्री.गणेश , हनुमान इ. शिल्पे आढळतात.काही ठिकाणी  एका मिश्र प्राण्याचे शिल्प आढळते. त्यास ‘ शरभ’ असे म्हणतात. जे  जलदुर्ग  जंजिरा ,घोसाळा,अर्नाळा , गोवा दुर्ग  येथे आढळते. हा  शरभ शिव शंकराचा अवतार असून तो एक बळकट प्राणी असल्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर हे शिल्प कोरले जाई.
१५. दुर्गांची  प्रवेशद्वारे – शिवनेरी वरील द्वारे  तसेच इतर अनेक किल्ल्यांवरील  दरवाजांची बांधकामे अगदी वैशिष्ट्यपूर्ण  आहेत
१६ .- किल्ले मांजरसुंबा – अहमदनगर जवळ. निजामशहा कालीन बांधकामे., दरवाजे , मंदिरे , हमामखाना , तलाव . पाण्याची मोट, पाण्याचे टाकामधून पाणी उचलण्याची व्यवस्था ., बुरुजांचे प्रकार वेगवेगळे ,
१७कोरलई किल्ल्याच्या चर्च मधील पोर्तुगीज लेख , रेवदंडा येथील एका घरात तुळई वर कोरलेली दृश्य इ. इतिहासाचे पुरावे देतात. दमन –दिव  चे त्रिकोणी बुरुंज वेगळेपण राखून आहेत.
         सरतेशेवटी  सचिन जोशी सरांनी दुर्ग भेटी दरम्यान आपण सर्व जण हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी त्याचे  documentation  करण्यास खूप काही करू शकतो. या स्थापत्यविषयक सर्व रचनांची मोजमापे घेणे . त्यांची रेखाचित्रे तयार करता येईल. दुर्गांवर सापडणारी रंगीत खापरे ,तुकडे तसेच बांगड्या , भांडी  यांवरून कालावधी शोधता येतो. अशी अपेक्षा व्यक्त केली.नक्कीच  सरांचे मार्गदर्शन सर्व इतिहासप्रेमी ,दुर्गप्रेमी , भटके यांना खूप महत्वाचे ठरणार आहे.

    सकाळचे  १० वाजून २५ मिनिटे होऊन गेली होती. आता नाश्ता आणि चहासाठी विश्राम घेणेत आला. कलादालनाबाहेरील व्हरांड्यात रांगेतून नाश्ता साठी  कुपन्स जमा केल्यानंतर  पोहे आणि चहा  वाटप करणेत येत होते.

     सर्वांनी रुचकर पोह्यांचा आस्वाद घेतला. चहापान झाले. खालच्या मजल्यावर व्हरांड्यात इतिहासविषयी ,गडकिल्ले तसेच भटकंती विषयक पुस्तकांचे सवलतीचे दरांमध्ये विक्री चालू होती.
अनेक लोकांनी आता या मेजवानीकडेही मोर्चा वळवला होता. नंतर अक्षरशः पुन्हा कलादालनात पुढील सत्रासाठी येण्याची वारंवार विनंती करावी लागली.
 दुर्गजागराचे  २ रे सत्र –
       आजचे तिन्ही व्याख्याते  यांचा सत्कार तसेच  इतिहासकालीन महत्वाच्या घराण्यांचे वंशज व्यक्तींचा  आणि महाराष्ट्रातील  दुर्ग संवर्धनात सक्रीय असलेल्या अशा  शिव सह्याद्री प्रतिष्ठान , शिवस्फूर्ती , झुंजार शिलेदार, गडवाट , दुर्गवीर , दुर्गसखा, दुर्गसंवर्धक महासंघ ,शिवराज्याभिषेक सेवा समिती , शिवस्पर्श प्रतिष्ठान इ. संस्थांचा सन्मान करणेत आला. ऐतिहासिक अशा कुसूर घाट पुनरुज्जीवन कार्यासाठी  मावळ एडव्हेन्चर चे श्री.विश्वनाथ जावळीकर यांना सन्मान देण्यात आला .त्याचबरोबर  १० वर्षे परिश्रम घेऊन   मी सह्याद्री हा लघुपट बनवणाऱ्या श्री विवेक काळे सर यांनाही गौरवण्यात आले.




     यानंतर अभ्यास वर्गाच्या २-या  सत्राचे सन्माननीय व्याख्याते श्री .भगवान चिले सर यांची थोडक्यात ओळख श्री.कुलदीप पाटील यांनी उपस्थितांना करून दिली.

 'मराठा आरमार आणि सागरी किल्ले'’’ –  मान.श्री .भगवान चिले सर ,कोल्हापूरचे सुपुत्र.
       आपल्या विषयाची प्रस्तावना करताना चिले सरांनी  गिरिदुर्गांची बांधणी यावर थोडा प्रकाश टाकला. राजगड किल्ल्याचा  ३ माचींमध्ये केलेला विस्तार वैशिष्ट्यपूर्ण  आहे. इथे सह्याद्रीच्या भूगोलाचा आणि भूगोलाच्या दुर्गमतेचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. भोरप्या डोंगराचीही अशाच प्रकारे  निवड करून इथे प्रतापगड वसविला.
      गिरीदुर्गांच्या साह्याने हिंदवी स्वराज्य बांधणी केल्यानंतर महाराजांनी सिंधुसागराकडे वळविले. या किनारपट्टीच्या मुंबई पासून खाली गोव्यापर्यंत विस्तार असलेली किनारपट्टी सुरक्षित करणेस आपलं आरमार उभारणी  आणि  जलदुर्ग बांधणी यांकडे लक्ष दिले.

     १ .किल्ले दुर्गाडी –इथे आरमारी गोदी च्या उभारणीस सुरुवात केली.जहाजबांधणी हाती घेतली.खंदेरी दुर्गच्या लढाई नंतर  ब्रिटीशांनी  आपली गलबते कशी वेगळ्या पद्धतीची होती  याचा उल्लेख आढळतो . खालचा भाग उथळ केल्याने सहज आपली गलबते सहज पणे खाली पाण्यात न धडकता निघून जात.आणि ब्रिटीश आपली जहाजे खाली निमुळती असल्याने लांबवरच थांबवावी लागत असत.
      २ .जंजिरा  किल्ला - सिद्दी जौहर कडून जिंकून घेण्याचा ७ वेळा प्रयत्न करणेत आला. ८ व्या वेळी कासा बेटावर पद्मदुर्गाची बांधणी करणेत आली.  तिथल्या लाय पाटलाच्या अन मोरोपंत पेशवे यांच्या साह्याने रात्रीत जंजिरा किल्ल्याला शिड्या लावून आत घुसण्याचा फसलेला प्रयत्न , त्यात लाय पाटलाला बक्षीस देताना महाराजांनी पालखी दिली. पण सागरावर फिरणाऱ्या  लाय पाटलाला हि भेट पटली नाही. मग महाराजांनी ‘ पालखी’ नावाचे जहाजच भेट दिलं.आणि उचित सन्मान केला.
      ३ .मालवण च्या जवळ कुरटे बेटावर ‘सिंधुदुर्ग’ ची उभारणी केली. यासाठी ५०० पाथरवट ,१०० पोर्तुगीज कारागीर आणि ३०० मजूर राबत होते. महाराजांनी किल्ल्याच्या तटात ४० शौच कूप बांन्धून घेतले.यातून शिवरायांची आरोग्याविषयी काळजी दिसून येते .
     ४. विजयदुर्ग – तिहेरी तटबंदी आहे . आपण त्यावरून फिरून बघितली पाहिजे. तिथे जवळच गावात असलेला ‘धुळपांचा वाडा’  ,आरमारी गोदी , रामेश्वर मंदिर  इ. अनेक बारीकसारीक गोष्टी आवर्जून बघाव्या.
     ५ . सन १६७९ – खंदेरी दुर्ग बांधणी साठी मायनाक भंडारी यांनी ४०० सहकारी मदतीला घेऊन काम केले. एकीकडे युद्ध आणि एकीकडे दुर्ग बांधणी अशा परिस्थितीत हे काम चालू होते.
      ६. सन १६८१ – शिवपुत्र संभाजी महाराजांनी  कुलाबा किल्ला ( अलिबागचा किल्ला ) बांधला.
      ७ . कान्होजी आंग्रे यांचे आरमारी कौशल्य उल्लेखनीय होते . वाघोटणे खाडी जवळ आरमार बुडवणेत आले. जाळणेत आले.
      ८.जलदुर्गांवर झालेल्या स्थानिक अतिक्रमणाविषयी त्यांनी निराशा व्यक्त केली.
           अ) अंजनवेल चा किल्ला - गोपाळगड येथे एका व्यक्तीने बाहेरील भूखंड विकत घेऊन नंतर किल्ल्याच्या आत आमराई पिकवली.व नंतर एके ठिकाणची तटबंदी फोडून आत ट्रक नेणेची व्यवस्था केली.
           ब ) तसेच भरतगड , अर्नाळा ,उंदेरी दुर्ग , गोवा दुर्ग , फत्ते दुर्ग  माहिमचा किल्ला  इ. किल्ल्यावरील अतिक्रमणांची माहिती दिली.
        ९ . एकीकडे किल्ले जंजिरा पाहण्यास सरकारने  स्थानिक लोकांची मदत घेऊन  बोटीने वाहतुकीची सोय केली आहे .पण दुसरीकडे पद्मदुर्ग किल्ला पाहण्यास समुद्रात थोडे आतवर जावे लागते. तिथे बोटींसाठी धक्का नसल्याने गैरसोय होते . भरती –ओहोटी चे गणित बघून आत जावे लागते. छोटी गलबते भाड्याने ठरवून  किल्ला पाहणेस जावे लागते.
         १० . सिंधुदुर्ग किल्ल्याला जाताना बोटी वाले पर्यटकांना उतरवले कि  किल्ला १ ते दीड तासात बघून घाईने पुन्हा बोटीसाठी येण्यास सांगतात. यावर चिले सर म्हणाले कि , एवढा  महत्वाचा प्रचंड किल्ला इतक्या कमी वेळात घाईने बघण्यात काही अर्थ नाही. यावर काही तरी उपाय व्हायला हवा.
      सरतेशेवटी प्रेक्षकांना उपदेश देत म्हणाले कि , संख्येने मी इतके किल्ले पाहिलेत व ते वाढवायचं आहे यासाठी किल्ले बघू नका. तर व्यवस्थित  वेळ घेऊन पूर्णपणे  किल्ला बघावा. भलेही कमी किल्ले पाहून होऊद्या. एक दिवसातली धावपळीने किल्ले पाहण्यात काही अर्थ नाहीये. पायात बूट , सोबत पाण्याची बाटली , खाऊ ( चिक्की पाकिटे इ. पौष्टिक )  असं सर्व तयारीने जावे.
        दुर्ग सहली अगोदर त्या दुर्गाबद्दल माहिती अभ्यासा , त्याच्या नोट्स काढा मग किल्ल्यावर गेलं कि ती सर्व  ठिकाणे शोधून बघा.  पुस्तकात सांगितलेलं  काही वास्तू  वगैरे किल्ल्यावर फिरताना सापडले नाहीतर त्या लेखकाला फोन करून विचारा. आणि त्या लेखकानेही सांगितले पाहिजे. 
      शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या समाजाची लोकं स्वराज्य उभारणीत एकत्र आणले.ज्याच्या मनगटात शौर्य त्याला त्यांनी तसे पद दिले.पण आपण सध्या इतिहासतील त्या शूरवीरांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करण्यासाठी भेदाभेद करतो हे चुकीचे आहे.
        जलदुर्ग संवर्धन व्हावे  त्यांचा पर्यटन विकास व्हावा , उपयुक्त सोयी व्हाव्या यासाठी  उपस्थित असलेल्या सर्व व्यक्ती  आणि संस्था कडून संघटीत प्रयत्न व्हावेत हि अपेक्षा व्यक्त केली.

             या दुसऱ्या सत्रानंतर दुपारचे १२ वा. २५ मिनिटांनी भोजनासाठी विश्राम घेणेत आला. बाहेरील व्हरांड्यात कुपन्स जमा करून  भोजनाचे पेकेट्स आणि जिलेबी वाटप करणेत आले.( खालील छायाचित्रात या कार्यक्रमामागील खरा सूत्रधार दिसत आहे.)
                                               मी अन मित्रमंडळी मिळून अशा भारतीय बैठकीत भोजनाचा आस्वाद घेतला.
       भोजना नंतर पुन्हा प्रेक्षक पुस्तकांच्या विक्री कडे धाव घेत होते. तिकडून प्रेक्षकांना पुढल्या सत्रासाठी कलादालनात हजर होणेची वारंवार विनंती सूत्रसंचालकांना करावी लागली.


               भोजनानंतर अभ्यासवर्गाचे ३ रे सत्र चालू होणे अगोदर  १: १५ ते १:३०  या वेळेत शिवाजी नगर गावठाच्या मा.आवले सरांच्या शिलेदारांनी मराठ्यांच्या मर्दानी युद्धकलेचे नेत्रदिपक नमुने सादर केले त्यात तलवारबाजी , दांडपट्टा चालवविणे, लाठीचाल यां कला १ मावळ्यांसोबत कार्यक्रम सादर केला .
            कला दालनात उपस्थितांमध्ये एक स्फुरण चढवण्याचे काम यातून झाले. तदनंतर या मावळ्यांचा दुर्गमहर्षी श्री. मांडे सरांच्या हस्ते सत्कार करणेत आला. 

         दुपारी  १ वाजून ३० मिनिटांनी  ३ रे सत्रास सुरुवात करताना  दुर्ग महर्षी श्री. प्रमोद मांडे सर यांची थोडक्यात ओळख धनश्री लेकुरवाळे यांनी उपस्थितांना करून दिली.

                    दुर्गजागर अभ्यासवर्ग – सत्र ३ रे
                  “ भारतातील अदभूत दुर्ग आणि त्यांची दुर्गरचना ”- वक्ते - दुर्ग महर्षी श्री. प्रमोद मांडे सर –
                महाराष्ट्रात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे एक पराक्रमी व्यक्तिमत्व होऊन गेले तसेच भारतातील इतर राज्यांतही अनेक शूरवीर होऊन गेले.आपण अशा सर्व व्यक्तींची चरित्रे , पराक्रम समजावून घेणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांविषयीचे प्रेम, आदर आणि प्रेरणा  स्वातंत्र्यपूर्व काळात उमाजी नाईक , वा .ब .फडके , चाफेकर बंधू , वि.दा.सावरकर ,नेताजी सुभाषचंद्र बोस  तसेच भगतसिंग यांचेही नसानसांत भिनलेली होती.हे उदाहरणांतून स्पष्ट केले.

           उपस्थितांना आपल्या कडक ,परखड शब्दांत मांडे सरांनी विचारणा केली कि ‘ शिवाजी महाराज एवढे स्वस्त आहेत काय ?’ कि सारखी लोकं ‘शिव सकाळ ;, ‘शिव दुपार’ म्हणताना दिसतात.

            आपण शिवाजी महाराज रक्तात आणले पाहिजेत. नुसत्या प्रदर्शनात नको . गाढवी प्रेम न करता महाराज अभ्यासून घ्या मग प्रेम करा.इतिहासातल्या अनेक गोष्टी चढवून सांगितल्या जाताहेत. अशा चढवाचढवीची गरज इतिहासाला नाहीये. जे आहे ,होते तेच सांगावे.
तरुणांना सल्ला देत सर म्हणाले, फिटनेस आहे त्या वयात हे गडकिल्ले भटकंती करा ,त्यांचा अभ्यास करा.
              लष्करी दृष्ट्या किल्ले महत्वाचे पण आता त्यांकडे दुर्लक्ष्य होत आहे.याबद्दल खंत व्यक्त केली.
प्रत्येक गोष्टीला ऱ्हास हा ठरलेला आहे . त्यामुळे दुर्ग संवर्धनाच्या नुसत्या गप्पा नकोत तर प्रत्यक्ष कामात उतरायला पाहिजे.
              आपल्या विषयाला सुरुवात करत ते म्हणाले कि , भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले आहेत त्याखालोखाल उ.प्रदेश चा क्रमांक लागतो. स्लाईड शो द्वारे अदभूत दुर्गांची ओळख सरांनी पुढीलप्रमाणे करून दिली .
        १ .- किल्ले कुंभलगड – (अमरावती जिल्हा –अगदी उत्तरेला म .प्रदेश च्या सीमेजवळ .)
                  सात पाकळ्यांच्या बुरुंज हे अनोखे वैशिष्ट्य दिसून येते.
       २. अचलपूर किल्ला – ३ पाकळ्यांचा बुरुंज
यांचे सांधर्म्य महाराष्ट्रातील  उस्मानाबाद जवळील नळदुर्ग किल्ल्यातील उपांड्या बुरुज , विलक्षण असा  किल्ल्यानजीकचा बोरी नदीवर पाणी अडवून बांधलेला ‘ पाणी महाल’ यांची माहिती दिली.
        ३.बेकलचा किल्ला – केरळमधील
         ४.भोन्गीर  किल्ला – (म.प्रदेश ) एकसंध खडकात बांधलेला अदभूत किल्ला
         ५ .जिंजी –(तामिळनाडू ) ४ किल्ल्यांचा समूह असलेला  जिंजी किल्ला – येथे राजाराम महाराज मुक्कामी होते
        ६ . दिंडीगुल चा किल्ला
        ७ .गाविलगड
       ८ . मलंगुर  – आंध्रप्रदेश
       ९ .मांजराबाद --कर्नाटकातील – नुसतेच कोन असलेले बुरुंज आणि तटबंदी, ताऱ्याच्या आकाराची रचना –याचे बांधकाम टिपू सुलतान ने करविले होते.
       १०. पालक्कडचा किल्ला –( केरळ )
दरम्यान पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या महादरवाजा वरील स्वच्छता मोहीम आणि तिथे बुरुजावरती सापडलेल्या   पायऱ्यांची रचना यांचे वैशिष्ट्य मांडले.
      ११.गढगगरोन किल्ला -  नद्यांच्या संगमावर बांधलेला असा हा किल्ला . सरांनी तेथील स्वच्छतेची प्रशंसा केली.
     १२ – चित्तोड चा किल्ला
      १३- दबोई चा किल्ला – (गुजरात ) तटबंदी अद्भूत रचनेची
      १४ – जैसलमेर किल्ला – (राजस्थान ) याला १० व्या शतकाचा इतिहास आहे., अगदी अभेद्य अशी रचना , स्थापत्त्य .का किल्ला म्हणजे एक शहररचना होय .आतमध्ये ३ ते ५ हजार लोक राहतात. येथील ‘पटवाओंकी हवेली ‘चा विशेष उल्लेख सरांनी केला. हवेलीचे पूर्ण बांधकाम दगडात केले आहे.
      १५ – तारागड –( गुजरात , रणथांबोर जवळ )- याच्या तटबंदीचा आकार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा आहे .
      १६ – कुंभणगड –महाराणा प्रताप चा जन्म येथे झाला. तब्बल ३८ किमी . एवढी लांबलचक अशी तटबंदी आहे.
      १७ –मांडलागड – गडामध्ये पाण्याची उत्तम सोय करून घेतलेली.
      १८.मेहरानगड – म्हणजे जणू बुरुंजांचाच  किल्ला. मोठ्या संख्येने बुरुज बांधलेले.
     १९. नागोर – वाळवंटी प्रदेशात असलेला – अभेद्य असा किल्ला .
      २०.सोजतगड –( पाली जवळ , राजस्थान ) यावर  एकूण १२ स्वच्छतागृहांचा समूहाची बांधणी केलेली.
     २१.- तारागड –( बुंदी शहराजवळ ) – किल्ल्यात जाण्यास फक्त एकच रस्ता – पायथ्याशी एका महालातून वर जातो.तसेच  बुरुंज आणि तटबंदी च्या ५ -६  धारा खाली जमिनीकडे आणल्यात .म्हणजे शत्रू आलाच तर तो त्या तटबंदी मध्ये विभागून त्या वर हल्ला करून संरक्षण करता येईल.
     २२. मोहनगड – जैसलमेर जवळ (राजस्थान ) ....हा १९४८ मध्ये बांधकाम केलेला . भारतातील शेवटचा असा बांधला गेलेला किल्ला.
        अशा प्रकारे वैविध्यपूर्ण अशा अनेक अदभूत दुर्गांची , त्यांच्या रचनेची सचित्र माहिती मांडे सरांनी दिली. अधून मधून त्यांची टोलेबाजी , विनोदबुद्धी , शाब्दिक कोट्या इ. मुळे उपस्थितांना हसवत आणि जागृत ठेवत सरांनी साऱ्यांची मने जिंकली. त्यांचे प्रत्येक वाक्य जणू प्रत्येकाच्या मनावर ठसवले जात होते.
           भारतात एकूण २७०० पर्यंत किल्ले आहेत. त्यापैकी २०० – ३०० किल्ले सापडत नाहीयेत.महाराष्ट्रातील दुर्गांचे सर्व स्तरांतील व्यक्ती आणि संस्थांनी पद्धतशीर असे  जतन, संवर्धन करणेस पुढाकार घ्यावा. संवर्धन करीत असताना त्याच्या नोंदी केल्या जाव्यात. त्या माहितीचा एक केंद्रीय महामंडळ ‘Central Bureau’ स्थापन करावे.अशी अपेक्षा त्यांनी उपस्थितांना केली.आणि आपल्या विषयाचा समारोप केला.
       कलादालनातील सर्वांचे चेहरे आज प्राप्त झालेल्या मार्गदर्शनामुळे , अनोख्या दृष्टीमुळे उजळून गेले होते.
       आपला इतिहास , छत्रपती शिवराय, हिंदवी स्वराज्य  आणि हे गडकोट याविषयीचे नुसतंच दिखावू प्रेम , आदर यामध्ये न वाहवत जाता  प्रत्यक्ष अभ्यासाची गरज , अचूक माहितीची चाड ठेवून अभ्यासपूर्ण  दुर्ग दर्शन करणे , दुर्गसंवर्धनासाठी फक्त बाष्कळ गप्पागोष्टी न करता  मैदानात उतरून कामास हातभार लावणे  कसे आजमितीला अत्यंत गरजेच आहे. या  अनेक विचारांचे पिक आज उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनांमध्ये पेरलं गेलंय. ते जोमानं वाढावं. हा दुर्गजागर मनामनांवर ठसला जावा , त्याच फलित लवकर  मिळावं अशीच मनोमन कामना !!
        अभ्यासवर्गाच्या ३ ऱ्या सत्रानंतर  संयोजकांचे वतीने  दुर्ग महर्षी मांडे सरांचे शुभहस्ते शिव-सह्याद्री दुर्गसंवर्धन प्रतिष्ठान , दुर्गवीर प्रतिष्ठान  आणि दुर्ग सखा प्रतिष्ठान याकडे ‘ग्रंथ दिंडी ’ सोपवण्यात आली.



          यानंतर झुंजार शिलेदार प्रतिष्ठान , पुणे यांचे वतीने श्री. राहुल पापळ यांनी ९ मे ते १२ मे .२०१५ दरम्यान  पद्मावती ,पुणे येथे आयोजित '' मराठ्यांची शौर्यगाथा'' प्रदर्शन  आणि १४ ,१८ में रोजी आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमाची माहिती दिली.

        नंतर शिवस्फूर्ती  प्रतिष्ठान,पुणे यांचे वतीने श्री. प्रज्ञेश मोळक ( साकु ) यांनी संस्थेच्या श्री क्षेत्र तुळापुर  येथे , ‘ शिवशंभूतीर्थ’ या प्रस्तावित शिल्प प्रदर्शनी / स्मारक विषयी माहिती दिली. तसेच त्यासाठी इच्छुकांनी सहभाग व आर्थिक सहकार्य करणेचे आवाहन केले.

       आजच्या अभ्यासवर्गाचा समारोप करताना संयोजकांचे वतीने आभार प्रदर्शनाचे मोलाचे कार्य श्री.अजय जाधवराव यांनी आपल्या  शांत आणि मधाळ वाणीने पार पाडले.

           शेवटी शेह्बाज तांबोळी या युवकाच्या अल्काब ने संपूर्ण कलादालन हादरवून सोडले. सर्वांची वाहव्वा त्यांनी मिळवली. अन कार्यक्रमाची औपचारिक सांगता झाली.

            सदर अभ्यासवर्ग यशस्वीरीत्या  पार पाडल्याबद्दल संयोजक - हरीतभूमी फौंडेशन आणि त्यासोबत इतर मान्यवर संस्था , त्यांचे सर्व स्वयंसेवक तसेच आजचे माननीय वक्ते श्री.सचिन जोशी सर , श्री. भगवान चिले सर आणि दुर्गमहर्षी श्री. प्रमोद मांडे सर या सर्वांचे मी पुनश्चः आभार मानतो.या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभलेल्या महाराष्ट्राच्या सर्व भागांतून लाभलेल्या सर्व उपस्थित इतिहासप्रेमी , शिवशंभूप्रेमी , दुर्गप्रेमी , भटके, निसर्गप्रेमी मंडळींचेही मन:पूर्वक आभार !!
           आणि शेवटचे पण अगदी महत्त्वाचं – या मागचा खरा सूत्रधार , प्रसिद्धी पासून नेहमीच अलिप्त राहणारा  परंतु तरीही सर्वांच्या मनावर राज्य करणारा एक सच्चा इतिहासप्रेमी , सह्याद्रीप्रेमी ,निसर्गप्रेमी , भटका इ .असं सगळंच मिश्रण असलेला ... बोंबल्या फकीर अर्थातच रवीदादा  पवार याचे तर करावे तितके कौतुक कमीच आहे !
                                             शेवटी या फकीराच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना टिपायला मिळाला हे नशिबच !!

No comments:

Post a Comment