Tuesday, 19 May 2015

कोल्हापूर जिल्हा दुर्गभ्रमंती !!! आंदी लगीन दोस्ताचं आणि मग शिवगड आणि भुदरगडाचे !!

शनिवार ९ मे २०१५ .वेळ – दु.२ वा.४० मिनिटे .
       माझ्या दोस्ताचा ( अभिजित पाटलाचा ) विवाह सोहळा मोठ्या आनंदात पार पडला.स्टेजवर नुसती धामधूम होती.मी अधून मधून इकडे तिकडे फोटो काढीत फिरत होतो. एवढ्यात वरूण राजाने हजेरी लावली.वारं वावधान सुटलं.वऱ्हाडी मंडळींची धावपळ चालू झाल.विजा चमकू लागल्या.
      माझ्याही डोक्यात आता पुढच्या नियोजन बद्दल ढग दाटून आले. काही वेळाने इथलं सगळं आवरत आले कि मला इथून पुण्याकडे परत न जाता कोल्हापूरला .आणि तिथून गारगोटी या माझ्या भटक्या मित्राच्या म्हणजेच योगेश पाचंगे च्या सासुरवाडी ला मुक्कामी जायचे होते. तो आधीच तिथे येवून थांबला होता .दुसऱ्या दिवशी तो अन मी शिवगड आणि भुदरगड हे दोन किल्ले बघायला जाणार होतो.हे सगळं त्याचं नियोजन. आम्हा ट्रेकर्स ला जिकडे जावू तिकडे किल्ले पाहू !!....असंच वाटतं नेहमी. कामात काम आणिक ट्रेकिंग ही.
     मी आता पाऊस थांबायची वाट बघत होतो. एव्हाना नवरा नवरी चे स्टेजवरचे सगळे विधी संपूर्ण झाले होते. बाकीचे पाव्हणे मंडळी हि निघाली होती. नवरा –नवरी आणि घरची माणसं भोजनाला बसली.चला सगळं मस्त पैकी पार पडलं होतं. माझ्या डोक्यात पुढला  प्रवास आणि लागणारा  वेळ इ.गोष्टीबद्दल काटे फिरू लागले. आत्ता निघायला हवे.  सोबतच्या मित्रांना आणि नंतर डायरेक्ट  नवरदेवाला माझं ट्रेकचे नियोजन सांगितले. म्हटलं बाबा , ' तुझं लगीन तर पार पडलय आता एक –दोन गडांच लगीन लावतो आणि मग पुणेला माघारी '....तोपण खूशच ! ' ये भटकून म्हटला '.
     वेळ – सं.४ वा २० मि. .....नवरदेवाच्या धाकट्याला निलेशला एक टू –व्हीलर मागून घेऊन यष्टी  स्टेंड ला सोडायला लावले. तिथन यष्टीने जयसिंगपूर स्टेंड  ला गेलो.आणि मग कोल्हापूर ची यष्टी पकडली. काही वेळातच जोराचा धो धो पाऊस कोसळू लागला.टपावर दगडी मारल्यागत मोठ्ठाल्या गारा पडत होत्या.चारही बाजूंनी नुसते काळे ढग पसरलेले.
      मला पुढच्या प्रवासाची आणि दुसऱ्याच दिवशीच्या ट्रेक ची काळजी वाटायला लागली.योगेशला मी निघालोय हे फोन वरून सांगितले.
     साडेसहा वाजता कोल्हापूर मध्यवर्ती एस टी बस स्थानकातून गारगोटी ची बस पकडली.आणि निश्चिंत झालो. इकड आता पाऊस कमी झाला होता. सीट वर शेजारी बसलेले प्रवासी श्री. बबन सावर्डेकर यांच्याशी हळूहळू गप्पा रंगत गेल्या.एकमेकांची माहिती, नाव , गाव इ.गडकिल्ले ,इतिहास ,राजकारण ,शेती आणि शेवटी माझ्याशी संबंधित शिक्षण ह्या विषयाला पोचलो.मी एक मास्तर असल्याने माझी भूमिका सांगितली.मुलांना जे आवडतंय ते करू द्यावे,शिकू द्यावे . आपले विचार न लादता...त्यावर बबनरावांना एकच मुलगी असून त्यावर थांबून तिलाच चांगल शिक्षण देण्याचा त्यांचा मानस मला कळाला.वाह ! पुरेशी शेतीवाडी आणि चहा पावडर विक्री करून जास्त पैशामागे न धावता समाधानाने जीवन जगणाऱ्या या ग्रामीण भागातल्या ,मुलगी हीच धनाची पेटी मानणाऱ्या शेतकऱ्याला  मानाचा मुजरा !!
    गप्पांमुळे  आमचा २ तासाचा प्रवास कसा संपला ते कळलंच नाही.गारगोटी स्थानकात बबनरावांचा निरोप घेतला. योगेश सोबत त्याच्या सासुरवाडीला पोहोचलो.
     घरी पोहोचल्यावर योगेश च्या सौ.धनश्री पाचंगे , त्यांची माहेरपणाला आलेली बहिण सौ.भाग्यश्री आणि सासूबाई, सासरेबुवा सौ आणि श्री.धनाजी गजगेश्वर माझी  वाट बघत होते.ओळख पाळख झाली. थोडा ताजातवाना झालो.योगेश आणि मी उद्याच्या ट्रेक चे नियोजन ची चर्चा केली. सासरेबुवांना ही गडकिल्ले फिरायची आवड हे उल्लेखनीय !! म्हणून तर असं सासुरवाडी मुक्कामी आले कि योगेशचे सोबत जाऊन आजूबाजूचे किल्ले दाखविले आहेत. नायतर दुसरे एखादा सासरा म्हटला असतां .काय हे बिन कामाचं भटकायचा नाद जावयाला.काही वेळाने तर सासरेबुवांनी आमच्या सोबत असलेलं श्री भगवान चिले यांचे ‘दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्यातले’ हे पुस्तकंच घेतलं आणि बसले वाचीत. धन्य ती योगेश ची सासुरवाडी !!
अशा या भटक्या जावयाला ,योगेशला ...... अजून काय हवं !!!
    उद्याची तयारी म्हणून आम्ही एका ब्याग मध्ये पाण्याची बाटली, क्येमेरा ,टोप्या इ .गरजेच्या वस्तू भरून  ठेवल्या .  साग्रसंगीत,स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. मग बाहेर थोडी शतपावली करून आलो.त्यानंतर योगेश ने मस्त गरम कॉफी बनवली .गेलरी त बसून ती प्यायलो.थोड्या गप्पा टप्पा झाल्या.आणि  ११ वाजता झोपी गेलो.
     रविवार १० मे २०१५.
    पहाटे ५ वाजता उठलो.सर्व आवरून ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे बरोब्बर ६ वाजता मोटारसायकल ला किक मारून निघालो.....रस्त्याच्या दुतर्फा  मस्त हिरवीगार शेतं , हवेतला गारवा ,हळू हळू जागी होत असलेली गावं......मध्ये एके ठिकाणी चहा मारला.अशा वातावरणात आम्ही गारगोटी – मुथळतिट्टा – - राधानगरी – अशा मार्गाने पुढे कोल्हापूर ते कणकवली या रस्त्याने फौंडा घाटातून  दाजीपुर गवा अभयारण्य क्षेत्रातल्या शिवगड साठी मार्गक्रमण करीत निघालो.
   गप्पा मारीत ,आजूबाजूचे फोटो काढीत ७० ते ८० कि मी चा प्रवास करून आम्ही फोंडा घाट रस्त्यावरील दाजीपुर गावात पोचलो.
    सकाळचे ८ वाजलेले.....दाजीपुर अभयारण्याचे प्रवेशद्वार अशी चौकी.
       आम्ही तिथले नियम इ सांगणारे फलक वाचले.नोंद आणि तिकीट घेणे साठी समोरच्या कार्यालयात गेलो.तिथे कुणीच नव्हते.एवढ्यात  रस्त्याने जाणाऱ्या  एका  तरुणाला विचारले....तर धक्काच दिलं त्याने. अभयारण्यात  प्राणी गणना चालू असल्याने १२ तारखेपर्यंत प्रवेश बंद आहे असं सांगितले.तरी समोरच्या सरपंचाच्या घरात विचारून बघा म्हणाला. आमचा मुडच पालटला .
सरपंच बाईंचे पती दरवाजात आले.त्यांना सांगितले, ‘ शिवगड बघायचाय .लांबून आलो.’ तर .., ‘ नाही जमणार.बंद आहे प्रवेश .’....तरी मी ..' काहीतरी जमलं का बघा म्हटलं ? '....तर , ‘ कुणी पोरगं पाठीवले असते तुमच्या बरोबर किल्ला दाखवाया पण आमच्या गावात देवीचा मोठ्ठा कार्यक्रम आहे.कुणी येणार नाय.’असं उत्तर मिळाले . ...
     माझं मन तर लय नाराज झालं.एवढं लांब परत काय येणं म्हणजे खरं नाही. गडा पाशी येवून असं माघारी जायचं .पहिल्यांदाच  असं काही घडतंय. योगेशने गाडी माघारी फिरवली. आणि प्रवास चालू.पण माझ्या मनात विचार चालूच !.... थोडं अंतर गडी माघारी फिरली.तरी मध्येच योगेशला म्हटलं चल परत. एकदा दुसऱ्या कुणाशी बोलून बघू.कुणी सोबत घेवून किंवा कसे.... एक ट्राय मारूब बघू .....लगीच गाडी पुन्हा ५ -१० मिनटात दाजीपुर मध्ये  गेटजवळ .....तिथं एक कार थांबलेली .सहकुटुंब प्रवेशासाठी लोकं आलेली. एक गावकरी त्यांच्याशी बोलत होता.त्याला विचारलं , ‘ भाऊ ,शिवगड पाह्यला जायचंय.सरपंच म्हटले प्रवेश बंद आहे....जमल काय ?’.....गावकरी , ‘ हा .शिवगड ला काय प्रोब्लेम नाही तुम्हाला.बाकी जंगलात  प्रवेश नाही आज’......अर्रे वाह !!! आम्ही जाम खुश !!.... चला आता काय काळजी नाही !!.....
गाडीला टांग मारून आम्ही पुढे जंगलात निघालो. पुढे कच्ची वाट लागते.
नंतर थोडं आत चढाने गेलं कि अभयारण्याची २ री तपासणी चौकी लागते.
आणि उजवीकडे  तिथल्या गेट मधून आत गेलं कि अभयारण्यात जातो.आणि डावीकडची वाट आपल्याला शेवटी गगनगिरी महाराजांचे माठापाशी नेते.चौकी पासून थोडे पुढे गेले कि  डावीकडे कुंपणे घातलेलं शेत आणि कोकरे कुटुंबियांचे कौलारू घर आहे.
तिथे पाणी वगैरे भरून आणि पिऊन आम्ही पुन्हा वाटेला निघालो.वाट थोडी चढ –उतार करून वर एका पठारावर पोहोचते .दोन फाटे फुटतात .उजवीकडे शेवटाला मठाला जातो ,आणि इथून डावीकडे सपाट पठाराने पुढे गाडी लावली कि आपण  कड्याला जातो.या पठारावर  उजवीकडे एक मोठा डोंगर दिसतो तो म्हणजे किल्ला नव्हे...सरळ कड्याला जाऊन समोर खाली पहिले कि या सह्याद्री च्या धारेपासून वेगळा असा शिवगड दिसतो....
समोर शिवगड दिसतो तिथून आता उजवीकडे कड्या ने चालत निघावे.एके ठिकाणी झाडांमध्ये देव देवतांच्या मूर्ती पुजेलेल्या असा चौथरा दिसतो. 

तिथेच शिवगडा ला जाण्यास पायवाट खाली जाते.
त्या वाटेने खाली जाताना समोर शिवगड दिसत होता.  शिवगड च्या अलीकडच्या एक टेकाड आणि हा कडा यांच्या मधील खिंडीत पोहोचलो ..१ ले उंबराचे झाड आहे.
त्याचे मागे त्या टेकडावर मधोमध  झाडांमध्ये ढासळलेली दगडी तटबंदी दिसली
.त्या टेकाडाच्या डावीकडून जाणारी पायवाट पकडून पुढे टेकाडाच्या पलीकडे सरळ निघालो .
थोडं पुढे गेलो आणि शिवगड ची तटबंदी दिसते.....
वर चढले कि आपण तटबंदीला लागून एक कोरड टाका आहे....शेजारीच एक बुरुंज आणि उध्वस्त असे गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वारआमच्या स्वागताला तयार !!

अजून वर गेले कि गडाची दुहेरी तटबंदी आणि दोन कोपऱ्याचे २ बुरुज दिसतात.
पद्धतशीर किल्ला बघून व्हावा यासाठी आम्ही डावीकडच्या बुरुज आणि तटाने फिरत निघालो.
सभोवतालचा हिरवागार निसर्ग , दाट जंगल ...खालती कोकण बाजूकडील दाट झाडीत लपलेली गावं...
गडाचा आकार आयताकृती आहे.आम्ही मागच्या दोन कोपऱ्याच्या २ बुरुजापाशी पोचलो.
तिकडून गडगे सखल गावाकडून एक वाट गडाला येते....आम्ही फेरी पूर्ण करून पुन्हा गडाच्या प्रवेशद्वारच्या बाजूला आलो.त्या दुहेरी तटबंदी तून वर आले कि  दगडी चौथऱ्यावर सतीशीळेचा एक कोरीव पाषाण पुजलेला दिसला.
अजून आत आलो कि समोर उध्वस्त असा राजवाड्याचा चौथराच शिल्लक दिसलं....
अजून थोडं पुढ गडाच्या मध्यभागी घरांचे चौथरे दिसले....गडाच्या आसपास  जंगल असल्याने ,प्राण्यांचा वावर आणि  शक्यतो मनुष्य नसल्याने  १ -२ जणांनी इथे गडाला येणे थोडे असुरक्षितच वाटले.
     गडावर आवर्जून पाहणेसारखी ठिकाणे म्हणजे -
१ल्या टेकाडावर असलेली तटबंदी, गडाचे प्रवेशद्वार तटबंदी, त्याला लागून कोरडे पाण्याचे टाके आणि बुरुंज , नंतर वर आले कि  दुहेरी तटबंदी ,
चार कोपऱ्याचे चार बुरुज , चारही बाजूंची तटबंदी , सतीशिळेचा पाषाण , राजवाडा आणि घरांचे चौथरे .
हे सर्व पाहून मनसोक्त फोटोग्राफी करून  आम्ही बुरुजापाशी सावलीत थोडी पेटपूजा केली.
११ :३० वाजता गडातून खाली उतरलो.आल्या वाटेनं तो कडा आणि टेकाड मधल्या खिंडीत आलो..उंबराच्या झाडासमोर डावीकडे कारवी मध्ये अजून एक उंबराचे झाड आहे
तिथून त्या कड्यावरून धबधबा पडतो त्या दिशेने निघालो.कारवी तून धबधब्यासमोर आलो
.तिथे कातळात एक टाके / कुंड आहे.वरच्या धबधब्याचे पाणी कातळात पाटाने खाली या कुंडात येण्याची सोय केली आहे.
पूर्वी गडावर पाणी नसल्याने याचा वापर पाणी साठवणे साठी केला जात असावा .
         इथून २-५ मिनिटात खिंडीत आलो.तिथून ५ -८ मिनिटात आम्ही कड्यावर देवाच्या चौथऱ्या पाशी पोहोचलो. थोडं ५ मिनिटे विश्रांती घेतली.नंतर मग कच्च्या वाटेनं मूळ वाटेला आलो
.गगनगिरी महाराजांच्या मठाकडे निघालो.इथेच ‘ झान्जुचे पाणी’ म्हणजे वरती डोंगरातून येणाऱ्या झऱ्याचे पाणी हे वैशिष्ट्य पूर्ण ठिकाण आहे.






तसेच गगनगिरी महाराजांच्या  जलतपस्येने पवित्र असे हे ठिकाण. त्यांच्या पादुका वर नतमस्तक झालो. इथे भेट झालेल्या या मंडळींसोबत फोटो घेतला.
     बरोब्बर १२ :३० वाजता आम्ही अगदी खुशीत परतीची वाट धरली.
कच्च्या वाटेने अभयारण्यातून बाहेर पडताना अने पक्षी त्यांचे वेगवेगळे आवाज , रंगीबेरंगी फुलपाखरे  आणि इथला वैशिष्ट्य असा पिवळ्या रंगाचा ‘लोई  पोपट’ बघितला.
       दुपारचे १ वाजण्याच्या सुमारास फोंडा घाट रस्त्याला गाडी पोहोचली.
आता राधानगरी वरून गारगोटी असे निघालो. मध्ये एक ठिकाणी जेवलो.अन मग गारगोटी तून १५ कि मी.वर भुदरगड किल्ल्यावर पोहोचलो.डांबरी सडक आपल्याला किल्ल्यात पोहोचवते
.पण याचमुळे हौशे नवशे गवशे गडावर सहज येतात आणि पावित्र्य पार धुळीस मिळवतात असे इथे झालेय.सडक किल्ल्यातील भैरवनाथ मंदिरापाशी संपते.इथे त्याच्या भक्तांचीच जास्त गर्दी होते .पण गडकिल्ले भक्तांचे मात्र दुर्लक्ष्य दिसतंय.तमाम जनतेचा हा पिकनिक स्पॉट आहे हा. आम्ही मंदिरापाशी न थांबता त्याचे मागे पश्चिम  बाजूकडे तटबंदी कडेने चालत गेलो.
भक्कम तटबंदीवरून थोडं फिरलो.वेळ कमी असल्याने मागे येवून सोबत गाडी घेतली.भैरवनाथ मंदिराच्या पलीकडे असलेलं शिवमंदिर आणि कचेरी बघितली.


मग गाडी वरून पश्चिम दिशेच्या बुरुज आणि तटबंदी पाह्यला गेलो. खणखणीत असे हे बुरुज....
तटावर जाण्या येण्या साठीच्या या पायऱ्या....असे आता आम्ही उलटी फेरी मारीत निघालो. पुढे एके ठिकाणी छोट पाण्याचे टाके आहे.
गडाच्या मध्यभागी एकदम भव्य असा बांधीव ‘दुधसागर तलाव ‘आहे.
पांढऱ्या मातीमुळे पाण्याचा रंग पांढरा दिसतो. त्याचे पाणी गडावर केल्या जाणाऱ्या शेतीला दिलं जात .या तलावाच्या बाजूंनी अनेक समाध्या  आणि पुरातन अशी मंदिरे आहेत.
तलावाच्या उजवीकडून पुढे आम्ही दक्षिण बाजूला तटबंदी कडे जावून आलो.इथेच कडेला एक नंदी आहे.



त्याच्या शेजारी एक भुयारात  पायऱ्यांनी खाली उतरले कि आत जखुबाई देवीची मूर्ती आणि इतर अनेक मूर्ती दिसल्या.




इथून थोडं डावीकडे पूर्वेला येताना एक कच्ची वाट जाखीनपेठ गावाला जाते.थोडे खाली गेलो.या बाजूने पूर्वी जे प्रवेशद्वार होते त्याचे फक्त अवशेष दिसले.
अजून थोडे खाली गेलो आणि उजवीकडे एक मोठी शिळा दिसली
.हिच ती ‘ पोखर धोंडी ’ म्हणजे मोठ्ठा दगड पोखरून आत एक खोली बनविली आहे.इथं करवंदे चाखायचा मोह काही आवरता आला नाही .
पुन्हा गडामध्ये आलो.आणि  तलावाजवळ असलेलं  शिव मंदिर बघितले.
तसेच पुढे पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाजूने फेरी मारून पुन्हा पुन्हा तलावाच्या पश्चिम बाजूने असलेलं जुने शिव मंदिर  त्यानंतर अंबामाता मंदिर  बघितले.अप्रतिम अशी हि पुरातन मंदिरे !
सहा वाजत आले होते आणि आमची गड फेरी पूर्ण झाली होती.शेवटी भैरवनाथ मंदिराला भेट दिली.

गर्दी कमी झाली होती त्यामुळे अगदी छान वाटले.मंदिर आतून व्यवस्थित पहिले .फोटो घेतले. भैरवा पुढे माथा टेकला.बाहेर दीपमाळ आहे
.मंदिरासमोरच दोन लहान आकाराच्या दीपमाळा आहेत.
तटा जवळ एक दीपमाळ ,ध्वजबुरुज आणि तोफ आहे.


सुर्यनारायण हि आता कार्यभार उरकून निघाला होता.त्याला अभिवादन करून आम्हीही गडाचा निरोप घेतला .
शेवटी बोनस म्हणून गडाच्या पायथा पेठ शिवापूर गावात असलेले पुरातन शिव मंदिर बघायाला गेलो.




बाहेर असलेली नदींनी पेलावलेली कमी उंचीची दीपमाळ , मंदिराच्या दर्शनी भिंतीवरील कोरीव मूर्ती , श्री गणेश ,आणि आतील शिवलिंग ...सगळचं अप्रतिम !! ...डोळ्यांत आणि क्यामेरात साठवून घेऊन आम्ही    वाजण्याच्या सुमारास पेठ शिवापूर सोडलं आणि गारगोटी च्या दिशेनं रवाना झालो.
         आजची हि शिवगड आणि भुदरगड भटकंती एवढी एडजेष्टमेंट करून  अगदी पद्धत शीरपणे नियोजनानुसार पार पडली.यासाठी आम्ही दोघेही मनोमन खुश होऊन गारगोटी मध्ये योगेशच्या सासुरवाडीच्या घरी पोहोचलो. आत्ता मोठ्ठी गडबड करायची होती. लगेच सर्वजण एका हॉटेलात पोहोचलो .सोलकरी,तांबडा आणि पांढरा रस्सा संगतीला पिऊन चिकन आणि अंडा करी वर ताव मारला.
        नंतर घरी येवून ब्यागा आवरल्या .साश्रू नयनांनी योगेश चे सासू अन सासरे यांनी कन्या धनश्री  आणि जावयाला योगेश ला  निरोप दिला....अशा अनेक भटकंती साठी त्यांचे प्रेमळ आशीर्वाद घेऊन आम्ही तिघे एस टी स्टेंड वर पोहोचलो.  पावणे नऊ वाजता डायरेक्ट पुणे  जाणाऱ्या गाडीत बसलो....गाडीत बसलो असतानाही आज दिवस भरातले सगळे काही  पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे तरळत होते.
       होतीच अशी एक अविस्मरणीय भटकंती !!

काही महत्वाचं - :
१. कोल्हापूर हून कोकणात जाताना फोंडा घाटाने जाताना रस्त्यालाच दाजीपुर अभयारण्य प्रवेशद्वार लागते.
२.किल्ले शिवगड पाहण्यास एकूण वेळ ....गाडी कच्च्या रस्त्याने नेऊन ...एकूण ३ तास पुरेसे आहेत.त्या रस्त्याने जाणारे दुर्गप्रेमी ,इतिहास प्रेमी ,निसर्गप्रेमी भेट देऊ शकतात .
३.दाजीपुर अभयारण्य प्रवेशाबाबत -- तिकिटे मिळण्याची वेळ स .७ ते दु.२ :३० अशी आहे....दर मंगळवारी प्रवेश बंद असतो. अभयारण्यात फिरण्याची वेळ स .७ ते सं. ६ वाजेपर्यंत असते.
४.आदल्या दिवशी  संध्याकाळी इथे मुक्कामी राहण्याची सोय आहे.....जेवणाची सोय हि मिळते .सकाळी लवकर अभयारण्यात प्राणी ,पक्षी पाहण्यास जाऊ शकतो.
५ .किल्ले भुदरगड हा गारगोटी या तालुका ठिकाणा पासून अंदाजे १२ -१३  किमी.अंतरावर आहे. स्वत:चे वाहन असल्यास आपण गडावर पोहोचतो.