Monday, 11 May 2015

आमची मोटारसायकल वारी !!.....श्रीमंत किल्ल्यांच्या दारी !!....भाग - ३ रा

         शनिवार ,२७ डिसेंबर २०१५ ... वेळ – दुपारचे १२ वाजले होते .
         बनोटी गावातल्या आमचे यजमान गावकऱ्यांचे आभार मानले.आणि पुढच्या....... या वारीतल्या ४थ्या श्रीमंत किल्लाच्या ओढीने मोटार सायकल ला टांग मारली.इथला सुतोंडा किल्ला काही डोळ्यासमोरून जाईनाच्च !.....बनोटी –सोयगाव रस्त्याने भर उन्हात ,धुळीने सजवलेल्या अगदीच खराब अशा डांबरी ने गाडी धावत होती. मध्ये एके ठिकाणी मस्त चहा मारला .पुन्हा वाटेला लागलो. 
         सोयगाव च्या मुख्य चौकातून वेताळ वाडी किल्ल्या साठी उजवीकडे वळालो. तेथून ४  कि.मी. नंतर वेताळ वाडी गाव ओलांडून पुढे गेले कि  डावीकडे एक डोंगर आहे.याच डोंगरावर वेताळ वाडी किल्ला वसवलेला आहे.
या डोंगराला वळणे घेत जाणारा हळदा घाट पूर्ण चढून वर गेलं कि डाव्या बाजूला डांबरी सडके ला लागुनच एक पायवाट किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला जाते.
         आम्ही  इथे २ वा .१० मिनिटांनी पोहोचलो. डावीकडे संपूर्ण किल्ला त्याचे भले मोठ्ठ्ले असे बुरुंज , तटबंदी ,प्रवेशद्वार आम्हाला खुणावत होते .
         परंतु पोटात भुकेचा डोंब उसळला असल्याने आम्ही प्रथमतः जवळ कुठेतरी घर वगैरे शोधण्याचे आणि जेवण बनवण्याचे ठरवलं.जवळपास काही घर वगैरे किंवा माणस दिसणेही मुश्कील .हळदा गाव इथून २ कि.मी.दूर आहे .आणि त्या पायवाटेच्या कोपऱ्याला गाडी उभी करून किल्ल्यात जावून जेवण बनवणे आणि मग किल्ला पाहणे आणि तेही गाडी अशा निर्जन अशा ठिकाणी ...एक धोक्याचे वाटत होते .
         मी योगेश ला  सुचवलं कि मी थोडे पुढे डांबरी रस्त्याने जावून कुठे काही घर , माणसे दिसतात का ते पाहतो.त्याला तेथेच थांबवून मी पुढे गेलो.थोडे घाटाने आणखी पुढे गेलो. उजवीकडे एक शेतात माणसे आणि एक पडवीवजा झोपडं दिसलं.छायाचित्रात या शेताचा मालक कु. विठ्ठल जाधव. हळदा गाव.
बस्स ! होणार सोय ..म्हुणुन मी गाडीसकट तिथे पोचलो.बाजेवर बसलेले गृहस्थ दिसले रामराम ठोकून मी म्हणालो, “किल्ला बघाया आलोय. जेवण बनवायचं आहे .आडोसा पाय्ह्जे .जमलं का इथे ?.”....गाववाले , “हा ,चालतंय कि.ह्या सपारात बनवा जेवण ”..वाहः   ," मी माझ्या दोस्ताला किल्ल्यापाशी थांबिवला आहे त्याला आलो घेऊन लगीच" म्हणालो .माघारी आलो तोवर योगेश वैतागून गेला होता.त्याला घेऊन शेतात पोहोचलो.
        गाडीच्या ब्यागा  काढून घेतल्या. त्यातलं स्वयंपाक साठीच्या वस्तू काढू लागलो . आणि योगेश ला जवळ कुठ पाणी होतं तिकडं हंडा घेऊन पाण्याला पाठवलं.
        एवढ्यात गावावाल्यानी त्या पोराला ते सरमाडाचे साप्पार (पडवी ) साफ कराया लावलं. हे असं असतंय  बघा . जान ना पेहचान पण एवढी सेवा करत्यात हि माणसं !
             ५ -१० मिनिटात योगेश पाणी घेऊन  आला.
          मी गेस पेटवून खिचडी भात बनवायची  तयरी केली .आता योगेशला कांदा, गाजरं चिराय दिली . हां...ह्ये असंच असतंय ...भटकंतीवर असताना सगळ्यांना कामे समान वाटून घेऊन करावी लागतात.आणि करतात सुद्धा !! ....लई मज्जा येते .
             ३ वा १५ मि..... गरमागरम खिचडी भात ...सोबतीला ...कांदा ,गाजरं . लिंबू ....पोटभर जेवलो.
                        पोटाची  भूक भागवली आता या भटक्या मनाची भूक भागवायची होती.
             ४ वाजत आले होते. सोबत पाण्याच्या बाटल्या अन खाऊ घेऊन गाडी तिथच लावून आम्ही किल्लासाठी चालत निघालो . डांबरी सडकेने नंतर पायवाटेन किल्ल्याच्या या घाटच्या बाजूने असणाऱ्या मुख्य प्रवेश द्वारापाशी आलो.किल्ल्याचा व्याप मोठ्ठा आहे.
            जवळ पोचलं कि दोन मोठ्ठाले बुरुंज स्वागताला उभे ...
थोडं आत गेलं कि तसाच एक प्रचंड बुरुंज दिसतो .त्याला कला कुसर केलेली कोरीव सज्जा दिसून येतो. याच्या वरून इथवर पोचलेल्या शत्रूवर हल्ला करण्याचे प्रयोजन असावे बहुदा .
आमची तर दोघांची कशाचे फोटू काढू अनं कशाचे नाही असं होऊन गेलं होतं.या किल्ल्याच्या श्रीमंतीच्या दर्शनाची जोरदार सुरुवात झाली.
इथे चांगली फारस बंदी केलेली आहे .
समोरचं उभ ठाकलेले.....किल्ल्याचे उत्तर मुखी प्रवेशद्वार ....तोंडात बोटं घालायला लावणारं ....या द्वाराचे तोंड जंजाळा  गावाकडे असल्याने याला ‘ जंजाळा दरवाजा ‘ असं म्हणत असं उल्लेख आढळतो. २० एक फुट उंचीचा जे भव्य द्वार ...वरती दोन्ही बाजूस शरभ शिल्पे कोरलेली दिसून येतात.
                            दाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यान्साठी देवड्या आहेत
.उजवीकडेच च्या देवडीत  थोडं सांभाळून वर जाणाऱ्या जिन्याने आम्ही वरती गेलो. दरवाजाच्या वरील भागात प्रशस्त असे अनेक दालन आहेत .इथून खाली दरवाजा दिसतो.
दरवाजापासून थोडं आत गेलं कि त्या दरवाजावर असलेल्या छतावर जावून नंतर छतातून खाली उतरणाऱ्या छोट्या खाचेतुनहि आपण त्या मोठ्या दालनात पोहोचू शकतो.
इथूनच त्या एका मोठ्या बुरुजावर जाता येते. भोवतालचा विस्तीर्ण असा किल्ल्याचा परिसर दिसतो....सर्वात खाली वेताळ वाडी धारण......भक्कम पणे उभी अशी तटबंदी...
बुरुजावरून खाली उतरून समोरच थोडं उजवीकडे वर गेलो  तिथे खराब पाणी असलेले तुटलेल्या खांबांचे टाके आढळले .
 पुन्हा खाली आलो ..तटबंदी उजवीकडे ठेवून चालत निघालो. त्या बुरुजाला आत पोटात नेणारी वाट दिसते...पण आत खूप अंधार आणि वटवाघूळाचे साम्राज्य असल्याने तो विचार सोडला.
असेच पुढे चालत पूर्व टोकाशी असलेला बुरुंज पाशी पोचलो.....बुरुजातून सर्व बाजूंचा प्रदेश न्याहाळला ...दरी उजवीकडे ठेवून वरती चालत गेलो. आणि बालेकिल्ल्यात पोहोचलो. हा बालेकील्याचा पूर्व बुरुज ...या  घुमट असलेल्या इमारतीच्या वर जाणाऱ्या वाटेने चढलो ,
तटबंदी वरून चालत पुढे गेलो.बालेकिल्ल्याच्या आत भागात भरपूर सीताफळाची झाडे वाढलेली आहेत.त्यामुळे आत फिरायला इथून वाट नाही. तसेच पुढे तटबंदी वरून मधल्या बुरुजापर्यंत जावे.आता आत खाली उतरलो....चालत गेलं कि जमिनीत बांधलेले एक तेल तुपाचे टाके दिसलं
. कुतूहलाने आत उतरून त्याची पाहणी केली.तसेच पुढे या टाक्याच्या बाजूला धन्य कोठाराची इमारत आहे.

पुरातत्व खात्याचा फलक असून इथे आतमध्ये  व्यवस्थित निगा राखलेली दिसली.
       याच्या समोर एक भग्न इमारत आहे.....पुढे गेलं कि नमाजगीर नावाची इमारत (मस्जिद ) आहे....इमारतीची बाहेरून वरती असलेली कोरीव कामे लक्ष वेधून घेतात..
.नमाज गिर च्या समोरचं एक मोठ्ठा तलाव आहे ....भक्कम अशी तटबंदी असलेला ...
      आता आम्ही दरी उजवीकडे ठेवीत ....बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागाकडे पुढे चाललो होतो....मध्येच  डावीकडे एक भग्न इमारत आढळली...
त्यानंतर किल्ल्याचे उत्तर टोकाशी असणारी हि बारादरी ....एक इमारत .....दोन मोठ्ठ्या कमानी असलेली हि बारदरी .....किल्ले देवगिरी वरील बारादरी सारखीच ....काय मस्त भन्नाट वारे लागत होते इथं......
.
समोर खाली उतरणाऱ्या धारेने आम्ही बरोब्बर बारदरी च्या खालच्या टप्प्यात असणाऱ्या किल्ल्याच्या वेताळ वाडी गाव बाजूच्या मुख्य दरवाजाकडे गेलो.
खाली एक बुजलेले टाका दिसलं..जवळच एक ६ फुट १० इंच लांबीची तोफ आहे...उजवीकडे तटबंदी मध्ये एक चोर दरवाजा आहे. त्यातून थोडं खाली उतरून पुढली वाट बघून येण्याचा मोह काय आवरला नाही.
....शेवटी दाट झाडीने वाट अडलेली दिसली आणि मागे आलो...पुन्हा वर आलो . 
      डावीकडे किल्ल्याचा वेताळवाडी गावाकडील भव्य दरवाजा आहे.
....पहिले उत्तराभिमुख प्रवेशद्वार ...याची कमानीची पडझड होत आहे...उंची २० फुट असून वरच्या बाजूस शरभ शिल्पे कोरलेली आहेत.
     थोडं पुढं डावीकडे लगेच दुसरे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असे......


.आतून दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.बाहेरून या द्वाराला डावीकडे एक थोडा लहान आकाराचा बुरुज आणि उजवीकडे मोठ्ठा ऊंच बुरुज उभा आहे.... त्या उजवीकडे च्या बुरुजावर हे असं  शिल्प आढळून आले.
          एकेक अशी किल्ल्यावरील सर्वच अत्यंत प्रेक्षणीय अशी सर्व स्थळ एव्हाना बघून झाली होती....या दरवाजा पासून खाली वेताळ वाडी गावात वाट उतरते.  आपण त्या वाटेने वर येवून किल्ला बघून पुन्हा गावात असे हि करू शकतो ...नाहीतर आम्ही केले तसे....
          आत्तापर्यंत आमचा किल्ल्याचा घाट कडील दरवाजा ,तिथली सर्व स्थळे ....बालेकिल्ला ..आणि उत्तरेकडील हा दरवाजा ...असं बघून झाले होते.
वेळ झाली होती – ६ वा .१५ मी....किल्ल्याच्या हळदा घाट बाजूकडील तटबंदी ने उरलेला फेरी पूर्णकरीत आम्ही तिकडच्या दरवाजा कडे निघालो.
     आमच्या उजवीकडे आत्ता भास्कर राव हि आपली फेरी पूर्ण करण्याचं नियोजनात होते .
         ४ – ५ बुरुंज ओलांडून आम्ही घाट जवळच्या मुख्य दरवाजात आलो....पुन्हा त्या  भव्य दरवाजा अन बुरुंजना नजरेत सामावून घेतलं काही फोटू काढले.  साडेसहा वाजले होते. अंधार पडू लागला होता....
      खाली पायवाटेने येताना पुन्हा पुन्हा हा प्रचंड विस्तार असलेला  किल्ला वळून वळून पाहतच आम्ही डांबरी सडकेने ...हळदा गावाकडे पायी निघालो....रस्त्याकडेच्या शेतात पोहोचलो.
गप्पा मारीत आणि किल्ला दर्शनाने प्रफुल्लीत मनाने ब्यागा आवरल्या .गाडीला बांधल्या. शेताचा मालक तो मुलगा ...कु .विठ्ठल जाधव ....त्याला आणि दुपारी तिथे भेटलेल्या त्याच्या मामाचे आभार मानून आम्ही निघालो  ....
     वेळ मिळाल्यास आमच्या नियोजनात नसलेले असे रुद्रेश्वर लेणी  जी वेताळ वाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात आहेत आता शक्य होणार नव्हती . त्यामुळे आम्ही या मोटारसायकल वारीतल्या ५ व्या आणि शेवट च्या श्रीमंत किल्ल्याच्या दिशेने निघालो.
     पुढे २ कि मी वर हळदा गावात उंडणगाव साठीच रस्ता विचारून पुन्हा मार्गस्थ झालो.....अंधारातून पुढे जाताना जंगल वजा डोंगरातून वाट जाते. आमची गाडी २ -३ वेळा मागच्या चाकापाशी काहीतरी घासत असल्याच्या आवाजाने थांबिवली....थोडं दगडाने ठोकून चैन वरील कव्हर नीट केलं.आणि पुन्हा गाडी पळविली.असे छोटामोठ काही न काही होतंच असत.
         पुढे उंडणगाव मध्ये गाडीत पेट्रोल भरले.आणि अंभई - नानेगाव – जंजाळा गावासाठी निवांत मोकळ्या अंधाऱ्या  रस्त्याने मी गाडी हाकत निघालो. एकूण आजपर्यंत चा ३ दिवसांचा पूर्ण आठवणींना उजाळा देत गप्पा मारीत आम्ही दोघं मोठ्ठ्या आनंदात अंतर कापले जात होते.
     त्यासोबतच आम्हाला आता जंजाळा उर्फ वैशागड किल्ल्याच्या जवळचे गाव जंजाळा इथे आजच्या मुक्कामाची सोय काय होतेय  याची थोडीशी काळजी वाटत होती.
रस्त्याने लागणारी छोटी मोठी गावे थंडीमुळे गपगार झोपलेली दिसत होती . सडकेच्या कडेचे अंतर सांगणारे कि .मी.चे  दगडआता  आम्ही पोहोचलोय असेदाखवत होते. समोरचं गाव आणि उजेड दिसू लागला. रात्रीचे ९ वाजता आम्ही या रस्त्याचे शेवटचे गाव जंजाळा इथे पोहोचलो....
      काही घरांपाशी शेकोट्या आणि  गप्पांमध्ये मग्न गावकरी दिसले. किल्ल्याकडे जायचं असं म्हटल्यावर सरळ जा असं माहिती मिळाली.एके ठिकाणी घरापाशी ब्रेक लावला .४ -८ माणस गप्पांत  गुंतलेली ....एकाने विचारले . “ किधर जाना है ? कहासे आये हो ”......आम्हा दोघांच्याही लक्षात होतं कि हे आपल्या मुस्लीम बांधवांच गाव आहे . असो ! आम्हाला फक्त माणसं आणि माणुसकी धर्म कळतो.आम्ही म्हणालं . “चाचा, किला देखना है .पुणे से आये है .आज रातकु किधर रहने का इंतजाम हो सकता है क्या ? और किधर दुकान है तो थोडा चावल चाहिये .खाना बनायेंगे ,सोयेंगे और कल किला देखके वापिस जायेंगे.”.....त्यांना सगळ्यांना आमचं जाम कौतुक वाटलं. एक जण उठलं आणि , “ आओ मेरे पीछे” म्हणून निघाले पुढे वाटेने .थोडं पुढं जिथं सिमेंट रोड संपतो.तिथल्या घरात ते गेले.घरातन पुन्हा बाहेर आले चावी घेऊन .आणि अजून लोकं बाहेर आली होती .समोरचं खोली उघडली आणि विचारले , “ ये है ...इधर राहो तुम.” ती खोली म्हणजे शेजारी त्यांचच किराणा  दुकानआहे  त्याची स्टोर रूम. त्या चाचा ने पोरीला खोलीत झाडू माराया लावलं .आम्ही लागलीच , “चाचा रहने दो .हम करेंगे”....पण व्यर्थ ! ....पोरींनी ते चांगल आवरलं ,झाडून घेतलं. आता चाचा ने दुसरी खोली म्हणजे दुकान उघडायला लावलं. काय ते पाहुणचार !....त्याची ती १२-१३ वर्षाची पोरगी सुद्धा आज्ञाधारक.दुकान उघडलं तिने. आम्ही तांदूळ , सकाळच्या साठी बिस्किटे वगैरे खरेदी केली. 
 नंतर  चाचा च्या पोरींनी हंडा भर पाणी आणून दिलं.आम्ही ब्यागा गाडीवरून उतरवून खोलीत गेलो. ब्यागेतल्या गरजेच्या वस्तू काढल्या .स्वयंपाक ची तयारी करू लागलो. सटकून भूक लागली होती.
वेळ रात्रीचे साडेनऊ .....जेवणाची तयारी....
खिचडी भातावर यथेच्छ ताव मारला ....
     जेवणा नंतर काही वेळ  गप्पा मारल्या. गेले ३ दिवस एवढ्या लांब प्रदेशात आम्ही दोघंच भटकत होतो. हे सगळं एकदम मस्त चाललं होतं.भेटणारी माणसं, त्यांचे बाबत चे एक से बह्डकर एक अनुभव , हे अति भव्य किल्ले , त्यांची वेगवेगळी रूपं....अगदी थक्क करून सोडणारी ....आणखी भरपूर काही अनुभवत होतो.आम्ही .  पण......आता उदया हा किल्ला बघून झालं कि ...हे सगळं संपणार.....परत आपल्या प्रदेशी !......मनात अनेक विचार घेऊन गारठलेल्या वातावरणात आम्ही अंथरुणात दडी मारली....
     मोबल्याच्या गजराने पहाटे लवकर जाग आली. थोडं आळसानेच आणि उत्साहाने आम्ही महत्वाची कामे उरकू घेतली. नंतर दंतमंजन . हातपाय तोंड धुवून ...मी मस्त चहा केला ....त्यासोबत लई दिवसांनी टोस्टखात होतो.
     रविवार २८ डिसेंबर २०१५ ...वेळ – सकाळचे साडेसहा.....
चाचाचे घरातली लोकं हि आता बाहेर दिसू लागली..चित्रात दिसतंय ते चाचा चे घर आणि दुकान ....
           मोठ्ठ्या ब्यागा तिथेच खोलीत ठेवल्या .पाणी आणि खाऊ घेऊन ७ वाजता आम्ही किल्ल्याच्या दिशेने टांग मारली. इथून पुढे शेतातल्या वाटेने दगड माती तून आम्ही आमच्या वारीतल्या  ५ व्या श्रीमंत किल्ल्या कडे जात होतो.
           काय ती सोनेरी सकाळ !!..... गुलाबी थंडीत न्हालेली.... तिकडून ते काल आम्हाला निरोप दिलेले सुर्यनारायण आज पुन्हा आमच्या सोबतच त्येंसुद्धा  कोवळे उन्ह घेऊन आज पुन्हा हजेरीला येत होते. शेतांमधी वाहणारी भन्नाट गार हवा ....सगळचं विलक्षण !!

     या रांगेतल्या डोंगराच्या शेवटच्या टोकावर वसलेला किल्ला वैशागड आमच्या स्वागताला आकाशात जणू  वेगवेगळ्या रंगांची उधळण करीत होता. आम्ही जवळ पोहचलो. किल्ल्याचे बुरुंज आणि तटबंदी दिसली . माहितीनुसार अलीकडच्या शेतात आम्ही एक तोफ शोधू लागली....आणि हीच ती....तोफ...८ फुट लांब अशी .....
तोफ बघून आम्ही गाडी पुढे दामटली .तटबंदी फोडून बनवलेल्या वाटेतून आम्ही गाडी घेऊन किल्ल्यात प्रवेश केला.....

आता उजवीकडेच तटबंदीत लपलेला चोर दरवाजा बघितला.इथून समोर पाहिलं कि दूर वेताळ वाडी किल्ला आणि धरण दिसते .
    पूर्वेकडे अजून थोडं पुढे गेलो तर मोठ्ठाल्या झाडांमध्ये लपलेला किल्ल्याचा पूर्वाभिमुख दरवाजा दिसला.

तरीपण आम्ही तिथं जमेल तसे घुसलो.थोडी झाडे बाजूला सारून वाट करत पुढे गेलो .देवड्या शाबूत आहेत. मध्ये फरसबंदी ची वाट....तसेच भव्य असा २० फुट ऊंच दरवाजा  नंतर थोडं खाली  त्याचे दोन्ही बाजूला भव्य बुरुंज खालून दरवाजा दिसून येत नाही अशी ती रचना ...असे ते दृश्य .. मागे किल्ल्यात आलो ..पायवाटेने पुढे गेलं कि एक मोठ्ठा बांधीव तलाव दृष्टीस पडला.
तलाव ओलांडला ...डावीकडे तटबंदी मध्ये किल्ल्याचा उत्तराभिमुख असा ‘जरंडी दरवाजा ‘ लागला.तिथेही तसेच . सीताफळांच्या झाडांची गर्दी ...थोडं फांद्या बाजूला करून घेतल्या .


गडाच्या पश्चिमेकडून जरंडी गावातून इथे वाट येते. या जरंडी दरवाजाच्या बाहेरून  वरती आढळून येणारे दोन ओळींचे हे शिलालेख ...
    इथून पुढे गेलो.समोरच झाडांमध्ये एक इमारत आणि बुरुंज दिसला .तोही झाडांनी वेढलेला ....
तिथेच असलेल्या खिडकीतून वर गेलो ..आत शिरलो ..गचपण आहे ...अनेक कमानीचा हा राणीमहाल......आजूबाजूला इमारतींचे अवशेष दिसतात.गचपण मधून वाट काढीत त्या अवशेषांमध्ये फिरलों. त्यातून बाहेर आलो. .इथे आत बसून थोडी पेटपूजा केली. पाणी घेतलं .पुन्हा फेरी चालू.



उजवीकडे समोर उंचवट्यावर एक जतन केलेली इमारत आहे...ती म्हणजे तीन कमानींची मस्जिद ..
उंचवटा उतरून खाली आलो. वाटेवर एके ठिकाणी हि दोन शरभ शिल्पे ठेवलेली आहेत.
पुढे उजवीकडे एक तलाव आहे त्याला लागुनच सय्यद –अल –काद्री- या पीराची कबर आहे. येथे व्यवस्थित निगा राखलेली आहे.तिथेच फारसी भाषेतले तीन ओळींचे असे दोन शिलालेख कोरलेले दगड आहेत . त्या तलावाचे पाणी पिण्यास वापरले जाते.
      
समोर उजवीकडे पूर्वेस अजून एक मोठ्ठा तलाव आहे ..या तलाव पासून उजवीकडे तटबंदी च्या दिशेने गेलो.


         तिथे भरपूर झाडांच्या गर्दीत हरवलेला पुर्वाभिमुख असा ‘वेताळ वाडी दरवाजा’ दिसला .वाट काढत त्याची फरसबंदी केलेली वाट, दोन्ही बाजूच्या देवड्या बघून पुढे बाहेर उतरणाऱ्या भव्य पायरीचे वाटेने खाली गेलो. तिकडून या प्रवेशद्वाराची भव्यता अजून उठून दिसत होती. वेताळ वाडी कडून या किल्ल्याला येणारी हि मुख्य वाट ....मस्त फोटू घेतले....तिकडून एके ठिकाणी तटबंदी वरती चढलो.आणि मग त्या द्वाराची रचना , त्याचे  झाडामध्ये गडप झालेले बुरुंज ....किल्ल्याची लांबलचक धावणारी तटबंदी...सगळंच वेडावून टाकणारं असं दृश्य !....
या किल्ल्याची हि इतकी अनेक प्रवेशद्वार....त्याचे बुरुंज...!
        आता या प्रचंड मोठ्ठ्या अशा विस्तारलेल्या किल्ल्या तली आमच्याकडील यादीनुसार सर्व ठिकाणे ,वास्तू, रचना शोधून हुडकून काढीत ....बघून झाल्या होत्या. ७ वाजेपासून सुरु झालेली ही भ्रमंती आता  १०: १५ वाजता पूर्ण झाली होती.तरी देखील आम्ही यादी पुन्हा पुन्हा चाळून काही बघायचं राहील नाही ना याची खात्री करीत होतो. आणि आम्ही दोघेही अगदी हौशी....बघूया सगळंच म्हणणरे ....
        आजची हि भल्या सकाळची किल्ले दर्शन फेरी तून आलेला शरीराला आलेला थकवा आणि  लागलेली भूक भागवायला त्या मोठ्या तलावापाशी निवांत बसलो.
पेटपूजा केली.  मस्त थंडगार  पाण्याने हातपाय तोंड धुवून ताजेतवाने झालो....आणि महत्वाचे म्हणजे एकमेकांची क्लोज अप फोटोंची हौस केली....काय मज्जाच !! फक्त  दोघे असले कि कसे कोणत्याही गोष्टीला लगेच तयार ....
बरोब्बर ११ वाजता किल्ल्यातून बाहेर पडलो.त्या शेतातल्या तोफेपाशी किल्ल्याचे भरपूर फोटू काढले ...आणि आमचेही...
        ५ वा आणि शेवटचा श्रीमंत किल्ला हि मनसोक्तपणे बघून झाला होता....आता पुढचे ठिकाण म्हणजे इथून शेतात वाटेलाच लागून खाली डोंगरात असलेली घटोत्कच लेणी....

हि बौद्ध लेणी पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून अलीकडेच ....खाली उतरून तिथं जाणारी पायऱ्यांची वाट बनवली आहे...
.लेणी कडे  खाली जात असताना पलीकडच्या डोंगरात अर्धवट कोरलेली लेणी दिसली.
डोंगराच्या घळीत असल्याने पावसाळ्यात आजुबाजूंना धबधबे वाहतात.आणि गर्दी लोटते...मुख्य लेणी पाशी अलीकडे हि मूर्ती आहे....
       हे मुख्य  असे प्रशस्त दालन... कोरीव काम ,नक्षी आणि एकूण २० खांब असलेलं....    
बरोब्बर समोरछोट्या दालनात मोठी बुद्ध मूर्ती आहे....बाजूच्या भिंतीवरही अनेक बुद्ध मूर्ती कोरलेल्या आहेत. इ .सनाच्या ५ व्या शतकात हि लेणी खोदलेली आहेत असा उल्लेख आढळतो.
मुख्य दालनाच्या बाहेर बाजूला एक छोटे दालन आहे .
३० -४० मिनिटे इथे सर्व बघून घेतलं.काय बघू काय नको अशीच अवस्था ...
        दुपारचे १२ वाजून ३० मिनिटे .- लेणी मनसोक्तपणे  पाहून  आणि पुढच्या नियोजनावर लक्ष केंद्रित ठेवून आम्ही माघारी गावाकडे  निघालो.
खोलीवर आलो .  कालचा उरलेला खिचाडी भात मस्त गरम करून ( परतून )  सटकून खाल्ला. भांडी घासून  सगळ सामान भरले .ब्यागा आवरल्या.
एव्हाना आमच्या बद्दल च्या कुतूहलामुळे गावातली भरपूर चिल्लीपिल्ली आमच्या बाजूला गोळा झालती.
     आता या मोटारसायकल वारीची सांगता होणेची वेळ काही तासांवर आलेली होती. पण प्रवासाचा लांबचा पल्ला  पार पडणे हा महत्वाचा भाग बाकी .... मोटारसायकलीची थोडीफार देखभाल करून घेतली..
.ब्यागा गाडीवर लादल्या. आमचे इथल्या मुकामाची सोय करणारे गफ्फार कुटुंबीय यांचे आभार मानले. चाचा शेतात गेले असल्याने भेट झाली नाही हि खंत.
  
      छायाचित्रात गफार चाचांची ती दुकान चालवणारी , हुश्शार , आज्ञाधारक अशी सुकन्या !....सीमा गफ्फार ..अगदी उजवीकडे...
      आमचा दोस्त  दरम्यान त्या शेंबड्या पोरांसोबत फोटू काढणेत चांगलाच रमला होता. त्यांच्यात आम्हाला आमचं बालपणच आठवत हो....या बच्चेकंपनी सोबत ग्रुप फोटू घेतला आणि आम्ही या गावाचा निरोप घेतला.... सगळ्या आठवणींचा ,अनुभवांचा खजाना सोबत घेऊन आमची गाडी या गावातून बाहेर पडली खरे...पण आम्ही अजूनही तिथंच....मनाने...
      नानेगाव –अम्भई – भराडी – मार्गे आम्ही सिल्लोड या तालुक्याच्या गावाला पोहोचणार होतो. मध्ये बोजगाव या छोट्या गावातल्या जि.प.शाळेपाशी थांबलो.
फोटू काढले.आमचा एक परम मित्र तिथे ४ -५ वर्षे शिक्षक म्हणून राहिला होता. सध्या तो आळंदी ला आहे ... आमच्या मित्राला अजून ती लोकं लक्षात ठेवून आहेत बर....त्याच कामच होत मोठ्ठं !..तिथे उपस्थित गावकऱ्यासोबत थोड्या गप्पा मारून पुढे निघालो.
      नंतर वाटेनं कपाशी ची आणि आल्याची शेतं आमच्या दोन्ही बाजूने पळताना दिसत होती.
        सिल्लोड मध्ये गर्रम चहा सुर्रके पियो केलं.आणि पुन्हा गाडी चे भुर्रर चालू...
         संध्याकाळचे ५ वाजता संभाजीनगरात दाखल... वाहतुकीतून वाट काढीत आणि शहर न्याहाळत बाहेर पडलो.नंतर सलग ३ -४ तास गाडी दामटली. अ.नगर ओलांडून पुढे सुपे जवळच्या एका धाब्यावर जेवणाला थांबलो.... 
      परतीचा प्रवास संपत आला होता. एक मोठ्ठ्या वारीचं  , नव्हे आनंद सोहळयाच नियोजन सुफल संपूर्ण झाले होते. चिकन वर चांगलाच ताव मारला.फोटू हि काढला. 
रात्री.१२ वाजता आळंदीत प्रवेश केला. आजच्या या परतीच्या प्रवासात....एकूण ३७० कि.मी.चा प्रवास करून तब्बल १२ तासांनी वारीची सांगता झाली....
     गुरुवार ,२५ डिसेंबर २०१४ ते रविवार २८ डिसेंबर २०१४....४ दिवस....५ श्रीमंत किल्ले दर्शन !!...जवळ जवळ  ३६०० छायाचित्रे .....एकूण ९१७ कि.मी.चा मोटारसायकल प्रवास ....
       अशी ही आमची मोटारसायकल वारी....अगदी मनाप्रमाणे !....अहं अपेक्षेच्या कैक पटीने अधिक भन्नाट पार पडली.
      माझा दोस्त योगेश पाचंगे (कोथरूड,पुणेकर )...याचं मोलाचा  सहभाग , अनेक ठिकाणच्या दत्तू सोनावणे च्या सारख्या,  वेगवेगळ्या, अनोळखी  व्यक्तींचे सहकार्य.....  अविस्मरणीय !! सगळंच...... 

या अगोदरचा भाग २रा साठी ...लिंक  - http://rajjeshjadhav.blogspot.in/2015/05/blog-post_6.html 
 अन भाग १ला साठी लिंक - http://rajjeshjadhav.blogspot.in/2015/04/blog-post.html

2 comments: